आष्टी- ब्रम्हगांव - मुगगांव रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:21+5:302020-12-29T04:32:21+5:30
आष्टी : तालुक्यातील आष्टी- ब्रम्हगांव - मुगगांव रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहतुकीस ...

आष्टी- ब्रम्हगांव - मुगगांव रस्त्यावर खड्डे
आष्टी : तालुक्यातील आष्टी- ब्रम्हगांव - मुगगांव रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावरील खड्डे पुढील दहा दिवसांमध्ये भरून घ्यावेत, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असे निवेदन ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्य महामार्ग ५७ ते ब्रम्हगांव - मुगगांव या ११ किलोमीटरच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम झाले आहे. हे काम अहमदनगर येथील कुशल कन्स्टक्शन कंपनीने केले असून, या कामाची अंदाजे किंमत २ कोटी २२ लाख रुपये होती. परंतु हे काम देखरेख करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याने आणि संबंधित गुत्तेदाराने संगनमताने निकृष्ट पध्दतीचे केले आहे. त्यामुळे पहिल्याच वर्षी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तेव्हा हे खड्डे संबंधित गुत्तेदाराने भरून घेतले होते. परंतु यावर्षी पावसाळ्यात पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी रस्ता खचला आहे. निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारावर आणि अभियंत्यावर कारवाई करून रस्त्यावरील खड्डे पुढील दहा दिवसांमध्ये भरून घ्यावेत, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आष्टी येथील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर सरपंच संदीप पानसांडे, उपसरपंच मारुती पवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष सानप, सुरेश पवार, संजय हराळ, श्रृगंरी देवस्थानचे सचिव देशमुख, विजय हराळ, संभाजी हराळ यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.