पैसेवारी जाहीर, जिल्ह्यात ३४८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:25+5:302021-01-08T05:47:25+5:30
बीड : जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये केवळ तीन तालुक्यांतील ३४८ गावांची पैसेवारी ५० ...

पैसेवारी जाहीर, जिल्ह्यात ३४८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
बीड : जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये केवळ तीन तालुक्यांतील ३४८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे, तर १ हजार ५० गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही ५८.७३ इतकी आहे. त्यामुळे अनेक गावांना नुकसान होऊनदेखील मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पीक काढणीला आलेले असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. तसेच अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार पेरणीचे संकटदेखील शेतकऱ्यांवर आले होते. यातून बाहेर येण्यासाठी राज्य शासनाकडून नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरसकट मदत घोषित झालेली नाही. तसेच जाहीर केलेल्या मदतीपैकी निम्मी रक्कम जिल्ह्यात प्रशासनाकडे शासनाने पाठवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाची मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान नजर आणेवारी सुमारे ६८ पैसे इतकी होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित आणेवारी जाहीर झाली, तर यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ४६ गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आली होती. तर, ३५६ गवांची सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली होती. मात्र, अंतिम पैसेवारीच्या अहवालामध्ये ३४८ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली आहे, तर तब्बल १ हजार ५० गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सरासरी एकूण पैसेवारी ५८.७३ पैसे इतकी आहे.
मदतीसाठी पैसेवारी महत्त्वाची
नुकसान झाल्यानंतर शासनाच्या मदतीसाठी जिल्ह्याची तसेच तालुक्याची व गावांची पैसेवारी ग्राह्य धरली जाते. ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असेल, तर त्या गावामधील शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अंतिम पैसेवारी ही महत्त्वाची आहे.
तालुकानिहाय पैसेवारी
तालुका गावे पैसेवारी
बीड २३९ ५३.००
आष्टी १७७ ६७.००
गेवराई १९२ ४७.००
शिरूर ९५ ६५.४७
पाटोदा १०७ ६३.४३
वडवणी ४९ ४७.००
अंबाजोगाई १०६ ६१.००
केज १३५ ६७.६१
परळी १०८ ६६.५०
धारूर ७३ ६१.००
माजलगाव १२१ ४६.००