बारा गावांच्या लोकांना शिरूरला येताना खावे लागतात खड्डयांचे दणके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:28+5:302021-01-04T04:27:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण आणि नित्य नैमित्तिक कामासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या बारा गावांमधील लोकांना जाटनांदूर ...

बारा गावांच्या लोकांना शिरूरला येताना खावे लागतात खड्डयांचे दणके
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्याचे ठिकाण आणि नित्य नैमित्तिक कामासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या बारा गावांमधील लोकांना जाटनांदूर ते शिरूर या रस्त्यावरील खड्ड्यांचे दणके रोजच येता-जाता खावे लागत आहेत. या मार्गावरील खड्ड्यांमध्ये आपटून ग्रामस्थांचे मणके खिळखिळे होत असून, रस्याच्या खड्डेमय वस्तुस्थितीकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रदीर्घ काळापासून होत असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडेही संबंधितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याविषयी जनतेतून फारशा चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत नाहीत.
गाव तिथे चांगला रस्ता यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे. मात्र, हा निधीच आता खड्ड्यात गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नांदूरपासून शिरूरकडे येणाऱ्या रस्त्यावरून कोळवाडी, रूप्पुर, गोमळवाडा, पिंपळनेर, सिंदफणा, सव्वसवाडी, चाहुरवाडी, वडळी, खोपटी, भडखेल, नांदूर व पुढे डोंगरकिन्ही, अमळनेरकडे प्रवाशांची नियमित वर्दळ असते. शिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही शिरूरला येत असतात. या सर्वांना खड्ड्यांमुळे रोजच जीवघेणा त्रास सहन करावा लागतो. अनेकांना मणक्याच्या विकाराला सामोरे जावे लागत आहे. रस्ता होईल तेव्हा होईल, परंतु पडलेले खड्डे तरी बुजवावेत, ही ग्रामस्थांची माफक अपेक्षाही पूर्ण होत नसल्याने याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सामाजिक बांधिलकीतून सचिन जायभाय यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी पाठपुरावा केला होता. या रस्त्याची सचित्र चित्तरकथा ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने खड्डे बुजवले जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र, तातडीनेचा अर्थ अजूनही उमगला नसल्याने या मागणीसाठी लोकांना आता रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करावे लागणार की काय, अशी प्रतिक्रिया सचिन जायभाय यांनी दिली.
प्रभारी राज काहीअंशी ठरते कारण
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिरूर येथील कार्यालय नामधारी आहे. या कार्यालयात उपअभियंत्याचा पदभार प्रभारींकडे असल्याने ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशी गत होत आहे. अनेकदा मागणीनंतर दिलेले आश्वासन पूर्ण होण्याआधीच बदली व प्रभारी असा सततचा खेळ कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले जाते.
अंदाजपत्रक सादर, कार्यादेशाची प्रतीक्षा
‘कोरोना’मुळे खड्डे बुजविण्याचे काम बंद होते. आता शिरूर ते सिंदफनापर्यंत कामाचे कार्यादेश संबंधित गुत्तेदाराला दिले आहेत. आठ दिवसात कामाला सुरुवात होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता शिवाजी सानप यांनी सांगितले.
सिंदफना ते नांदूरफाटापर्यंतच्या कामाचे अंदाजपत्रक सादर केले आहे. मात्र, या कामाचे कार्यादेश नसल्याने काम सुरू झालेले नाही. कार्यादेश मिळाल्यानंतर लगेचच काम सुरू होईल, असे कनिष्ठ अभियंता घोळवे यांनी सांगितले.