लोक मरताहेत अन् सीएस, तुम्ही झोपा काढता काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:31+5:302021-03-18T04:33:31+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील तक्रारी वाढत आहेत. उपचार आणि सुविधा मिळत नाहीत. लोक तडफडून मरत आहेत, सीएस तुम्ही करता ...

लोक मरताहेत अन् सीएस, तुम्ही झोपा काढता काय?
बीड : जिल्हा रुग्णालयातील तक्रारी वाढत आहेत. उपचार आणि सुविधा मिळत नाहीत. लोक तडफडून मरत आहेत, सीएस तुम्ही करता काय? तुम्हाला प्रशासन चालवता येत नाही का? असा सवाल उपस्थित करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना झापले, तसेच कोरोना वॉर्डचा राउंडही घेतला. आरोग्य विभागाच्या वाढत्या तक्रारींबद्दल नाराजी व्यक्त करीत केंद्रेकर रुग्णालयातून परतले.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच नॉनकोविड रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. असे असले तरी या रुग्णांना वेळेवर उपचार व सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, तसेच दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा सर्जन वेळेवर न आल्याने तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. यावर कोणती कारवाई केली? असा सवाल केंद्रेकरांनी डॉ. गित्तेंना केला. यावर संबंधित सर्जनला नोटीस बजावल्याचे सांगितले. अरे, पण तो माणूस मेला त्याचे काय? याला कोण जबाबदार? असा प्रतिसवाल करीत त्यांनी कारवाईचे निर्देश दिले, तसेच कोरोना वॉर्डमधील रुग्ण बाहेर फिरतात, त्यावरही आपण काहीच कारवाई करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावर डॉ. गित्ते यांनी नियोजन केल्याची सारवासारव केली; परंतु आजही सर्रासपणे कोणीही वॉर्डमध्ये जाऊन बाहेर येत असल्याचे वास्तव आहे. जिल्हा रुग्णालय आणि उपचार व सुविधा याबद्दल डॉ. गित्तेंना चांगलेच झापले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा आदींची उपस्थिती होती.
म्हणे, घटना सकाळी समजली
स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील इमारतीवरून अबोध भोसले या तरुणाने उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेबद्दल विचारताना केंद्रेकरांनी डॉ. गित्तेंवर प्रश्नांचा भडिमार केला. यावर एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. गित्ते म्हणाले, ती घटना मध्यरात्री घडली होती. त्याविषयी आरएमओने मला सकाळी सांगितले. यावर तुम्ही कोठे होता, बीडमध्येच होतात ना, असे म्हणत डॉ. गित्तेंना त्यांनी धारेवर धरले. असे प्रकरण पुन्हा घडणार नाही, लोकांचा जीव जाणार नाही, याची काळजी घ्या; अन्यथा मी आपल्याला जबाबदार धरून कारवाई करीन, असा सज्जड दमही दिला.
व्हाट इज युवर नेम?
कक्षात बोलावून घेत केंद्रेकरांनी तक्रारींबद्दल अगोदर कान उघाडणी केली. याविषयी उत्तरे देताना डॉ. गित्ते अडखळत होते. यावर संतापून सुनील केंद्रेकर यांनी व्हाट इज युवर नेम? असा सवाल केला. यावर डॉ. गित्ते असे म्हणत त्यांनी उत्तर दिले. केंद्रेकर बोलत असताना डॉ. गित्ते मोबाइलमध्ये डोकावत होते. यावरही त्यांनी त्यांना झापले.
रुग्ण, डॉक्टर, परिचारिकांशी संवाद
जिल्हाधिकारी कार्यालयातून सुनील केेंद्रेकर थेट जिल्हा रुग्णालयात पोहोचले. कोरोना वॉर्डामध्ये जाऊन त्यांनी रुग्ण, डॉक्टर व परिचारिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोणाच्या काहीच अडचणी नसल्याचे सांगत काम चांगले आहे, असे म्हणून ते गाडीत बसले.
सीएससमोर स्ट्रेचर मिळेना
सुनील केंद्रेकर येण्याआगोदर काही मिनिटे सीएस डॉ. गित्ते जिल्हा रुग्णालयात आले. याचवेळी एका जीपमधून एक वृद्ध महिला खाली उतरली. नातेवाईक तिला चालवत घेऊन जात होते. स्ट्रेचर दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे यावेळी डॉ. गित्ते आणि डॉ. राठोड दोघेही उपस्थित होते. तरीही त्या आजीला स्ट्रेचर मिळाले नाही, हे दुर्दैव.
सीईओ, तुम्ही सिव्हिल सांभाळा
डॉक्टरांचा हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी असून, त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक प्रशासन नीट सांभाळत नाहीत. त्यामुळे यापुढे सीईओ अजित कुंभार यांना रुग्णालय सांभाळण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी जगताप यांना तसा लेखी आदेश काढण्याचे निर्देशही दिले.
===Photopath===
170321\172_bed_19_17032021_14.jpeg~170321\172_bed_20_17032021_14.jpeg
===Caption===
स्ट्रेचर न दिल्याने या वृद्ध महिलेला नातेवाईकांना चालवत नेण्याची वेळ आली.~जिल्हा रूग्णालयाची पाहणी करताना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर. सोबत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, सीईओ अजित कुंभार, सीएस डॉ.सुर्यकांत गित्ते व इतर.