४५ वर्षांवरील दिव्यांगांना विनाप्रतीक्षा शनिवारी मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:39+5:302021-06-04T04:25:39+5:30
बीड : जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लस दिली जात आहे. यातच आता दिव्यांगांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. ...

४५ वर्षांवरील दिव्यांगांना विनाप्रतीक्षा शनिवारी मिळणार लस
बीड : जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लस दिली जात आहे. यातच आता दिव्यांगांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी सर्वत्र ४५ वर्षांवरील दिव्यांगाना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभाग आणि समाज कल्याणने केले आहे. या वयोगटात सहा हजार ७५० लाभार्थी आहेत. शनिवारी दिव्यांगांव्यतिरिक्त कोणालाही लस दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केलेले आहे. केवळ ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. यासाठी त्यांना ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक केले होते. याच गर्दीत जाताना दिव्यांगांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. ही फरफट थांबविण्यासाठीच केवळ दिव्यांगांसाठी शनिवारी लसीकरण सत्र आयोजित केले आहे. आरोग्य केंद्रनिहाय यादी तयार करण्यात आली असून, दिव्यांगांनी लसीकरणाला पुढे यावे यासाठी केंद्रनिहाय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून हे विशेष सत्र आयोजित केल्याचे सांगण्यात आले.
समन्वयासाठी नेमले पथक
समाज कल्याण विभागातील अपंग शाळेचे शिक्षक, कर्मचारी यांना लसीकरण केंद्रनिहाय ड्यूटी दिली आहे. त्यांनी आजूबाजूच्या सर्व दिव्यांगाना संपर्क साधून लसीकरणासाठी प्रोत्साहित करणार आहेत तसेच त्यांना मदतही करणार असल्याचे सांगण्यात आले.
तालुकानिहाय दिव्यांग लाभार्थींची यादी तयार केली आहे. त्यांना लसीकरणाबाबत प्रोत्साहित करण्यासह समन्वयासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. शनिवारी हे सत्र आयोजित केले आहे. आरोग्य विभाग यात सहकार्य करत आहे.
डाॅ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड
-----
ठळक मुद्दे
लसीकरण वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५
दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत व आधार कार्डची प्रत सोबत बाळगावी
ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही
केवळ ४५ वर्षांवरील दिव्यांगांसाठी हे सत्र असेल
इतर सामान्य लोकांना शनिवारी लस दिली जाणार नाही