जलयुक्त शिवारची देयके रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST2021-03-04T05:04:05+5:302021-03-04T05:04:05+5:30

बीड : युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणात राज्यात राबविण्यात आली होती. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार ...

Payments for watered camps stalled | जलयुक्त शिवारची देयके रखडली

जलयुक्त शिवारची देयके रखडली

बीड : युती सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही योजना मोठ्या प्रमाणात राज्यात राबविण्यात आली होती. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ही योजना बंद करण्यात आली. मात्र, जलयुक्त शिवार योजनेत कंत्राटदारांनी केलेल्या कामाची देयके रखडल्याचे चित्र आहे. मागणी करूनदेखील शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत.

बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्याप्रमाणात कामे झाली होती. त्यामुळे भूजल पातळीदेखील वाढल्याचे दिसून आले. परळी अंबाजोगाई या तालुक्यात मात्र या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. तसेच त्याठिकाणच्या जवळपास १५० पेक्षा जास्त ही कामे करणाऱ्या संस्थांना व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. मात्र, असे असले तरी, जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचा भूजल पातळी वाढण्यासाठी फायदा झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामे कंत्राटदारांच्या माध्यमातून करण्यात आली होती. या कामांची देयके शासनदरबारी रखडली आहेत. कंत्राटदारांची देयके अदा करण्यासाठी १६ कोटी ६३ लाख ७ हजार रुपये इतक्या निधीची मागणी प्रशासनाने केली आहे. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याचे कारण पुढे करत अद्याप निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

या विभागाची अशी आहे मागणी

विभाग निधी मागणी (लाखात)

कृषी अधीक्षक कार्यालय ९०९.८३

जलसंधारण विभाग ६५४.७४

जलसंधारण (जि. प.) ६७.३३

पाटबंधारे विभाग ३१.१७

एकूण १६६३.०७

पुन्हा होणार जलयुक्तच्या कामांची तपासणी

जिल्ह्यात कृषी विभाग, जलसंधारण, जलसंधारण जिल्हा परिषद, वनविभाग, पाटबंधारे या विभागांकडून जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आलेली आहेत. या कामांमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे राज्य शासनाने एसआयटी स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून कामांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. ती समिती येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची तपासणी करण्यासाठी येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

प्रतिक्रिया

जलयुक्त शिवार योजनेतील देयकांसंदर्भात तत्कालीन कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनीच निधी मागणी शासनाकडे केली आहे. अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. निधी प्राप्त सर्व तपासणी करून देयके अदा केली जातील.

डी. जी. मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

===Photopath===

030321\032_bed_26_03032021_14.jpg~030321\032_bed_25_03032021_14.jpg

===Caption===

जलयुक्त शिवार ~जलयुक्त शिवार योजना 

Web Title: Payments for watered camps stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.