नॉन-कोविडकडे लक्ष द्या, योजनांचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:05+5:302021-06-28T04:23:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुळे इतर आजारांसह योजनांकडे दुर्लक्ष झालेले आहे. आता नॉन-कोविड रुग्णांकडे लक्ष द्या. तसेच जननी ...

नॉन-कोविडकडे लक्ष द्या, योजनांचा लाभ द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे इतर आजारांसह योजनांकडे दुर्लक्ष झालेले आहे. आता नॉन-कोविड रुग्णांकडे लक्ष द्या. तसेच जननी सुरक्षा योजना, मातृवंदना योजनांचे लाभार्थी शोधून त्यांना आर्थिक लाभ द्या, अशा सूचना अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी दिल्या.
रविवारी जिल्हा प्रशिक्षण केंद्रात बीड तालुक्यातील आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. दीड वर्षापासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासह उपचारांसाठी धडपड करीत आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता नॉन-कोविडच्या कामांकडे लक्ष देण्याची गरज आहे. टीबी, कुष्ठरोग शोधमोहीम व उपचार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे, शिबिर घेण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोरोना चाचण्या वाढवून आलेल्या लसींचे नियोजन करून, गर्दी टाळून लाभार्थ्यांना लस देण्याबाबतही सूचना केल्या.
दरम्यान, सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गर्भवती महिलांची तपासणी करावी. जननी सुरक्षा योजना, मातृवंदना योजनेचा लाभही देण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉ. मोरे व डॉ. कासट यांनी सूचना केल्या. तसेच माता व बालकांचे नियमित लसीकरण करण्याबाबतही तालुका आरोग्याधिकारी डॉ. नरेश कासट यांनी सूचना केल्या.
...
टीएचओंचे काम कौतुकास्पद
जिल्ह्यात ५२ आरोग्यकेंद्रे आहेत. यात एकट्या बीड तालुक्यात तब्बल १० आरोगग्यकेंद्रे आहेत. यात बीड शहरातील मोमीनपुरा, पेठबीड, तालुक्यातील राजुरी, साक्षाळपिंपरी, नाळवंडी, पिंपळनेर, ताडसोन्ना, येळंबघाट, चौसाळा, लिंबागणेश आणि आता नवीन चऱ्हाटा आरोग्य केंद्राचा समावेश झाला आहे. कोरोनाकाळात या सर्वांचा आढावा घेणे व संपर्क साधण्याची जबाबदारी तालुका आरोग्याधिकारी डॉ. नरेश कासट यांनी योग्यपणे पार पाडली होती. इतर टीएचओंनीही त्यांना सहकार्य केले होते. बीडचे काम इतरांपेक्षा त्रासदायक असले तरी डॉ. कासट यांनी ते कौतुकास पात्र केल्याचे दिसत आहे.
===Photopath===
270621\27_2_bed_26_27062021_14.jpeg
===Caption===
बीड तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुचना करताना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे. सोबत डॉ.नरेश कासट, डॉ.मिर्झा बेग आदी.