रुग्णाचे नातेवाईक, परिचारिकेचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:02+5:302021-02-05T08:27:02+5:30
बीड : रुग्णालयातील कागदपत्रे देवाणघेवाणीवरून परिचारिकेला शिवीगाळ केल्याची घटना स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये शनिवारी सकाळी घडली. ...

रुग्णाचे नातेवाईक, परिचारिकेचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात
बीड : रुग्णालयातील कागदपत्रे देवाणघेवाणीवरून परिचारिकेला शिवीगाळ केल्याची घटना स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये शनिवारी सकाळी घडली. यात रुग्णाचे नातेवाईक व परिचारिका दोघेही पोलीस ठाण्यात गेले होते; परंतु उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद नव्हती.
बीड तालुक्यातील पेंडगाव, रामनगर येथील एक कदम नामक रुग्ण शुक्रवारी रुग्णालयात दाखल झाला. सायंकाळच्या सुमारास तो स्वेच्छेने घरी गेला. शनिवारी सकाळी तो पुन्हा आपल्या पत्नीसह रुग्णालयात आला. यावर दाखल होण्यासह कागदपत्रांच्या देवाणघेवाणीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तसेच परिचारिकेच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. इतर लोकांनी सोडवासोडव केल्यानंतर ही महिला पेठबीड पोलीस ठाण्यात पोहोचली. परिचारिकेनेही ही सर्व माहिती वरिष्ठांना कळवून पेठबीड ठाणे गाठले; परंतु या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
दरम्यान, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना विचारले असता, त्यांनी याबाबत एसीएसला विचारा, असे सांगत अंग काढून घेतले. तर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी भ्रमणध्वनीच घेतला नाही. तर सकाळी रुग्णालयात राऊंड घेतलेेले डॉ.राम देशपांडे यांना विचारले असता, परिचारिकेची तक्रार आली असून, ती वरिष्ठांकडे पाठविल्याचे ते म्हणाले.
कोट
रुग्णालयात वाद झाला होता. दोन्ही महिला ठाण्यात आल्या होत्या; परंतु त्यांनी तक्रार दिलेली नाही.
विश्वास पाटील
पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे पेठबीड.