विजयादशमी, बकरी ईद उमेदवारांच्या पथ्यावर
By Admin | Updated: October 6, 2014 00:14 IST2014-10-05T23:51:53+5:302014-10-06T00:14:27+5:30
बीड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आलेल्या विजयादशमी व बकरी ईद या सणांचा उमेदवारांनी बरोबर फायदा उचलला आहे़ शुभेच्छांसोबत मतासाठी गळ घातला जात आहे़

विजयादशमी, बकरी ईद उमेदवारांच्या पथ्यावर
बीड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आलेल्या विजयादशमी व बकरी ईद या सणांचा उमेदवारांनी बरोबर फायदा उचलला आहे़ शुभेच्छांसोबत मतासाठी गळ घातला जात आहे़ आपणच समाजाचे कसे तारणहार आहोत? हे पटवून देण्याची उमेदवारांत जणू काही स्पर्धाच निर्माण झाली आहे़
जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या वेगात सुरु आहे़ १५ तारखेला होऊ घातलेल्या मतदानाच्या अनुषंगाने उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत़ आमदार होण्याचे स्वप्न घेऊन आखाड्यात उतरलेल्या पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांनी मतदारांशी पोहोचण्यासाठी वेगवेगळे फं डे वापरायला सुरुवात केली आहे़ आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा डागण्याबरोबरच आश्वासनांचा भडीमार सुरु आहे़ महत्त्वाचे म्हणजे निवडणूक ऐन रंगात आलेली असताना उमेदवारांना जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे तगडे आव्हान आहे़ विजयादशमी, बकरी ईद या हिंदू- मुस्लिम बांधवांच्या सणोत्सवामुळे उमेदवारांचे काम अगदीच हलके झाले आहे़ दोन्ही समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचण्याची नामी संधी यानिमित्ताने उमेदवारांना मिळाली़ ही संधी ‘कॅश’ करण्याची सोडतील ते उमेदवार कसले? एऱ्हवी मतदारांकडे ढुंकूनही न पाहणारे नेते आता दारोदार शुभेच्छांचे संदेश देत फिरत आहेत़ सोबतच मतदान करायला विसरु नका? आमूक- आमूक चिन्ह आहे़़ लक्षात ठेवा़़़! अशी कळकळीची विनंतीही उमेदवार करु लागले आहेत़ विजयादशमीचा सण शुक्रवारी झाला तर बकरी ईद हा सण सोमवारी आहे़ विजयादशमीपाठोपाठ बकरी ईदच्या शुभेच्छांची सध्या रेलचेल सुरु आहे़ एक दिवस आधीच बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उमेदवार सरसावल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)