परळी थर्मलचा ऑक्सिजन निर्मिती प्लँट होणार एसआरटीमध्ये शिफ्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST2021-04-16T04:34:23+5:302021-04-16T04:34:23+5:30
अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय ...

परळी थर्मलचा ऑक्सिजन निर्मिती प्लँट होणार एसआरटीमध्ये शिफ्ट
अंबाजोगाई :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ यंत्रणेशी चर्चा करून परळीच्या थर्मल पावर प्लांट मधील युनिट क्र.८ चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
थर्मल पावर प्लांटमधील या ऑक्सिजन निर्मिती प्लँटद्वारे दर तासाला ८६ हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील एसआरटी ग्रामीण रुग्णालयात चोवीस तासात साधारण ३०० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होईल व यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ साठून पाणी खराब होऊ नये यासाठी हा ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित करण्यात येतो. केंद्रातील युनिट क्र.६ व ७ मधील ऑक्सिजन प्लँट पूर्ववत राहतील. युनिट क्र.८ मधला प्लँट मात्र अंबाजोगाईला शिफ्ट करण्यात येत आहे. शुक्रवारी ही सामग्री अंबाजोगाई येथे पाठवण्यात येईल. येत्या १० ते १५ दिवसात या प्लँटद्वारे प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होईल अशी माहिती थर्मल केंद्राचे अधीक्षक अभियंता मोहन आव्हाड यांनी दिली.
या प्लँटला कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री परळी थर्मल प्लँट प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. मुंडे यांच्या सूचनेनुसार अधीक्षक अभियंता मोहन आव्हाड व अधिकाऱ्यांनी एसआरटीमध्ये जाऊन प्लँटसाठी लागणाऱ्या जागेची पाहणी केली.
एसआरटी रुग्णालयातील ऑक्सिजन रिसिव्हर टँकची क्षमता एकावेळी २० हजार लिटर इतका ऑक्सिजन साठवून ठेवण्याइतकी आहे. त्यामुळे येथे आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
महावितरणमार्फत आलेल्या या सामग्रीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती प्लँटला अंबाजोगाईला शिफ्ट करण्यासाठी महावितर चे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, परळी औष्णिक विद्युत केंद्राचेअधीक्षक अभियंता मोहन आव्हाड, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, एसआरटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी वेगाने सूत्रे हलवली त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्याचे काम उद्यापासून सुरू होणार आहे.