परळी बसस्थानकाचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:13+5:302021-04-10T04:33:13+5:30

परळी : परळी बसस्थानकाचा आता कायापालट होणार आहे. बसस्थानक इमारत बांधकाम, सांडपाण्याची व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत काम, काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉकिंग ...

Parli bus stand will be transformed | परळी बसस्थानकाचा होणार कायापालट

परळी बसस्थानकाचा होणार कायापालट

परळी : परळी बसस्थानकाचा आता कायापालट होणार आहे. बसस्थानक इमारत बांधकाम, सांडपाण्याची व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत काम, काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉकिंग आदी कामांसाठी एकूण ५ कोटी ३४ लाख १० हजार रुपयांच्या कामाच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, येत्या काही दिवसांतच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीच्या जनतेला निवडणुकीत दिलेल्या आणखी एका वचनाची पूर्तता केली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथनगरी परळी शहराच्या बसस्थानकाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मागील सत्ताधाऱ्यांनी बसस्थानकामध्ये जाऊन अनेकवेळा या कामाचे निवडणुकाभिमुख भूमिपूजन केले, मात्र प्रत्यक्षात एक रुपयाही निधी त्यांना या कामासाठी उपलब्ध करता आला नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत बसस्थानकाचा कायापालट करण्याचे अभिवचन परळीकरांना दिले होते. त्यानुसार ना. मुंडे यांनी परिवहन विभागाकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून परळी शहर बसस्थानक इमारत नूतनीकरण व अन्य कामांसाठी हा निधी मंजूर करवून घेतला आहे. परिवहन विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या अंदाजपत्रकानुसार बसस्थानक इमारतीचा तळमजला व पहिला मजला पुनर्बांधणीसाठी २ कोटी ८९ लाख रुपये, सांडपाणी व्यवस्थापन व पाणीपुरवठ्यासाठी १४ लाख ४९ हजार रुपये, विद्युत कामासाठी २८ लाख ९८ हजार रुपये, काँक्रीटीकरण कामासाठी १ कोटी रुपये, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ८ लाख रुपये, लँडस्केपिंगसाठी ४ लाख रुपये व अन्य असे एकूण ५ कोटी ३४ लाख रुपयांचे काम पूर्ण करण्यात येईल.

येत्या काही दिवसांतच या कामास प्रत्यक्षात सुरुवात होणार असून, जलदगतीने व अत्यंत दर्जेदार पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना धनंजय मुंडे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

Web Title: Parli bus stand will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.