राख, धुळीच्या प्रदूषणाला त्रस्त झालेल्या युवकांचे परळीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:49 IST2021-01-08T05:49:22+5:302021-01-08T05:49:22+5:30

हातात राख आणि धुळीच्या प्रदूषणाच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलनकर्त्या तरुणांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. परळी शहर आणि तालुक्यात राखेच्या ...

Parli agitation of youths affected by ash and dust pollution | राख, धुळीच्या प्रदूषणाला त्रस्त झालेल्या युवकांचे परळीत आंदोलन

राख, धुळीच्या प्रदूषणाला त्रस्त झालेल्या युवकांचे परळीत आंदोलन

हातात राख आणि धुळीच्या प्रदूषणाच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलनकर्त्या तरुणांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले.

परळी शहर आणि तालुक्यात राखेच्या प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दररोज होणाऱ्या राखेच्या वाहतुकीमुळे ही राख रस्त्यावर पडते आणि ती वाहनांच्या चाकाने हवेत उडते. प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूळ आणि राख ही परळीकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून, त्यामुळे अनेक आजारही उद्‌भवत आहेत.

मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या प्रदूषणाकडे ना पुढाऱ्यांचे लक्ष आहे, ना प्रशासनाचे. दररोजच्या त्रासाला कंटाळणाऱ्या नागरिकांनी याबाबत दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण होत आहे. याचाच उद्रेक आता होताना पाहावयास मिळत असून, सोशल मीडियावर या गोष्टींचा निषेध नोंदवण्याबरोबरच आता नागरिक रस्त्यांवरून रोष व्यक्त करीत आहेत. याचीच झलक मंगळवारी पाहायला मिळाली.

परळीतील ओम शिवाजीराव काळे या युवकाने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मौलाना आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) या ठिकाणी हातात फलक झळकावून निषेध नोंदविला. मंगळवारी सकाळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी परळी नपचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची भेट घेऊन शहरातील राख वाहतुकीचा प्रश्न लावून धरला. शहरातून होणारी राख वाहतूक बंद करण्याची मागणी केली. या कामी नगर परिषदेने पुढाकार घेऊन शहर प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली. यावेळी योगेश पांडकर अरुण पाठक, अनिष अग्रवाल, सचिन गिते, बाळू फुले, नरेश पिंपळे व इतर उपस्थित होते.

Web Title: Parli agitation of youths affected by ash and dust pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.