दीडशे रुपयांसाठी पालकांना मोजावे लागणार हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST2021-07-13T04:08:05+5:302021-07-13T04:08:05+5:30
शालेय पोषण आहार : शालेय समितीमार्फत पैसे वाटप करा लोकमत न्यूज नेटवर्क उजनी : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार ...

दीडशे रुपयांसाठी पालकांना मोजावे लागणार हजार रुपये
शालेय पोषण आहार : शालेय समितीमार्फत पैसे वाटप करा
लोकमत न्यूज नेटवर्क
उजनी : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेला नाही. शालेय पोषण आहाराच्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात १५६ रुपये जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँकेत खाते काढण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. पहिली ती आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या पोषण आहार योजनेअंतर्गत मात्र दीडशे रुपये मिळण्यासाठी एक हजार रुपये गुंतवून बँकेत खाते उघडावे लागणार आहे.
शालेय सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता १५६ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता २३४ रुपये आहे. कोरोना संकटामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा परिस्थितीत शासनाने हा निर्णय घेतला असल्याने पालकांच्या सुद्धा चिंता वाढल्या आहेत. त्यातच सर्व सरकारी बँकांमध्ये पीक कर्ज प्रकरणांमुळे सध्या गर्दी वाढलेली आहे. अशा गर्दीमध्ये लहान मुलांना घेऊन जाणे जिकिरीचे ठरणार आहे. केवळ दीडशे रुपयांसाठी कोरोना काळात बॅंकेत चकरा मारून बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नाही. हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी पालक करीत आहेत.
.....
शालेय पोषण आहाराची रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा करावी. दीडशे रुपयांसाठी विद्यार्थी व पालकांची होणारी ससेहोलपट थांबवावी.
- ज्ञानोबा केंद्रे, पालक, उजनी.
......
शालेय पोषण आहाराची रक्कम शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना नगदी स्वरूपात देण्याचा पर्याय आहे, केवळ दीडशे रुपयांसाठी नवीन खाते परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने रक्कम समितीच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घ्यावा.
- विकास कातकडे, पालक.
....
रक्कम खात्यात जमा होणार
उन्हाळ्यात वाटप न झालेल्या शालेय पोषण आहाराच्या बदल्यात रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. त्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते काढण्यासाठी पालकांना सूचित केले आहे, असे कातकरवाडी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक मद्रेवार यांनी सांगितले.