मतदारसंघात बुथ रचना समितीच्या बैठकांचे सत्र ; कार्यकर्त्यांना आवाहन
परळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी अतिशय मेहनतीने हा मतदारसंघ उभा केला आहे. त्यांची मेहनत व्यर्थ जाता कामा नये, त्यासाठी मरगळ झटकून पुन्हा कामाला लागा, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. मतदारसंघात संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी त्यांनी बुथ रचना समितीच्या विविध बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सज्ज करण्यास सुरुवात केली आहे.
पंकजा मुंडे गुरुवारपासून चार दिवस परळीत असणार आहेत. मतदारसंघातील बुथ रचना समितीच्या बैठकांमधून त्यांनी संघटना बांधणीवर भर दिला आहे. गुरुवारी परळी ग्रामीणचे शक्ती केंद्रप्रमुख व प्रभारींची बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस प्रा. देवीदास नागरगोजे, समन्वयक शंकर देशमुख यावेळी उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे यांनी मतदारसंघात संघटनात्मक ताकद मजबूत करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. सत्तेची दोन वेळा संधी सोडली तर आपण विरोधी बाकावरच जास्त काळ होतो, सुरुवातीपासून आपण पक्ष संघटनेवर भर दिला होता. आता पुन्हा एकदा तशीच सुरुवात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी आतापासून कामाला लागण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. येत्या ६ एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिनापासून गावोगावी शाखा उघडण्याचा संकल्प करत पुन्हा ताकदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. दरम्यान शुक्रवार आणि शनिवारी परळी शहर आणि अंबाजोगाई तालुक्यातील बुथ रचना समितीची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे, जीवराज ढाकणे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, रमेश कराड, डाॅ. शालिनी कराड, राजेश गीते, उत्तमराव माने आदि उपस्थित होते. बैठकीचे संचालन चंद्रकांत देवकते यांनी केले.
===Photopath===
040321\025004bed_15_04032021_14.jpg
===Caption===
परळी मतदारसंघात संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी बूथ रचना समितीच्या विविध बैठका घेतल्या. बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के उपस्थित होते.