परदेशामध्ये गाडी चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरणही होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST2021-08-28T04:36:59+5:302021-08-28T04:36:59+5:30
अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याच्या परवान्याचे आता नूतनीकरण करणेही शक्य ...

परदेशामध्ये गाडी चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरणही होणार
अविनाश मुडेगावकर/
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याच्या परवान्याचे आता नूतनीकरण करणेही शक्य होणार आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी नूतनीकरणाचा पर्याय उपलब्ध नव्हता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय दूतावासात जाऊन याबाबतची प्रक्रिया परवानाधारकांना करता येणार आहे.
जिल्ह्यातील अनेक रहिवासी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात राहतात. तिथे गेल्यानंतर वाहन चालविण्यासाठी अनेक जण वाहन परवाना काढून त्याचा वापर परदेशात करतात. हा परवाना काढताना पुन्हा चाचणी देण्याची आवश्यकता लागत नाही. मात्र, सध्याचा वाहन परवाना, व्हिसा, पासपोर्टची पडताळणी करून स्थानिक अधिकारी त्यास परवानगी देतात. ही सोय आता ऑनलाइन पद्धतीने एका दिवसात पूर्ण होत असून, याची मुदत संपल्यास भारतीय दूतावासातून अर्ज केल्यास त्याचे नूतनीकरणही करता येणार आहे.
...
असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना...
१) वाहन परवाना काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे.
२) हा परवाना आवश्यक असलेल्यांना ‘सारथी’वरून ऑनलाइन प्रक्रिया करता येणार आहे. सध्याचा परवाना, व्हिसा जोडून ही प्रक्रिया होते.
३) प्रक्रिया ऑनलाइन असली, तरी कागदपत्रांची पडताळणी करूनच वाहन परवाना दिला जातो.
४) एक हजार रुपये शुल्कासह आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
....
कोण काढतो हा वाहन परवाना?
जिल्ह्यातील अनेक बांधव परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यांचे यास प्राधान्य आहे.
जिल्ह्यातील अनेक तरुण नोकरीसाठी जाताना परवाना घेऊन जातात. यात अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुणांची संख्या जास्त आहे.
केवळ नोकरी, व्यवसायच नव्हे, तर शिक्षणासाठीही परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा तरुणांसाठीही वाहन परवाना आवश्यक असतो.
...
आंतरराष्ट्रीय वाहन परवाना मिळविण्यासाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करून तो दिला जातो. नूतनीकरणाबाबत शासन निर्देशांचे पालन करण्यात येते.
-दत्तात्रय सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई.
..
कोरोना काळात संख्या घटली
कोरोना काळात एकही परवाना निघाला नाही
सन-२०१५- १
२०१६ - ८
२०१७ -२
२०१८ - १
२०१९ - ५
२०२० - ५
२०२१ - ०