वैद्यनाथ कारखान्यातून चोरीला गेलेल्या ३७ लाखांपैकी १९ लाखांचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:39+5:302021-01-09T04:28:39+5:30
या प्रकरणाचा छडा लावून हे साहित्य परळी ग्रामीण पोलिसांनी शहर व संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने जप्त केले आहे. परळी ...

वैद्यनाथ कारखान्यातून चोरीला गेलेल्या ३७ लाखांपैकी १९ लाखांचे साहित्य जप्त
या प्रकरणाचा छडा लावून हे साहित्य परळी ग्रामीण पोलिसांनी शहर व संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने जप्त केले आहे. परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे, मनोज जिर्गे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके, पोलीस नाईक पांडुरंग श्रीमंगले, शहरचे हनुमंत मुंडे संभाजीनगरचे डीबी पथक प्रमुख व्यंकट भताने आदींनी १९ लाखांचे चोरीचे साहित्य जप्त केले. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील साहित्य चोरी प्रकरणाचा परळी ग्रामीण पोलिसांनी छडा लावला.
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात गोदाम फोडून ३७ लाख रुपयांचे संगणक व इतर साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे चोरीची फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून सात जणांना अटक केली. यातील मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे. त्याचा परळी ग्रामीण पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.