यंत्रणेअभावी ऑनलाईन फेरफार दोन महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:31+5:302021-01-08T05:47:31+5:30

बीड : जिल्ह्यात ऑनलाईन फेरफार योजनेच्या अंमलबजावणीची सक्ती तर करण्यात आली, मात्र त्यासाठी पुरेशी यंत्रणा अद्यापही उपलब्ध करण्यात आलेली ...

Online changes stalled for two months due to lack of mechanism | यंत्रणेअभावी ऑनलाईन फेरफार दोन महिन्यांपासून रखडले

यंत्रणेअभावी ऑनलाईन फेरफार दोन महिन्यांपासून रखडले

बीड : जिल्ह्यात ऑनलाईन फेरफार योजनेच्या अंमलबजावणीची सक्ती तर करण्यात आली, मात्र त्यासाठी पुरेशी यंत्रणा अद्यापही उपलब्ध करण्यात आलेली नाही, त्यामुळे मागील २ महिन्यांपासून जिल्ह्यातील फेरफार काम ठप्प पडले आहे. त्यामुळे अनेकांचे व्यवहार रखडले आहेत. दुसरीकडे फेरफार होत नसल्याने लोक तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांना जाब विचारीत आहेत. मात्र ऑनलाईन फेरफारसाठीची यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रशासन काहीच हालचाली करताना दिसत नाही.

जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी, तसेच बँकांच्या कर्ज प्रकरणांसाठी आणि इतरही अनेक कारणांसाठी फेरफारची आवश्यकता असते. सध्या राज्यभरात फेरफार ऑनलाईन घेण्यात येत आहेत. मात्र बीड जिल्ह्यात फेरफार घेण्याच्या यंत्रणेत मोठ्याप्रमाणावर उणिवा आहेत. ज्या सर्व्हरवर हे फेरफार घेतले जातात , ते सर्व्हर पूर्ण क्षमतेने चालतच नाही. त्यामुळे फेरफारची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील तलाठी संघटना मागील दोन महिन्यांपासून याबद्दलचे रडगाणे प्रशासनाकडे गात आहे. यंत्रणा सक्षम नसल्याने मध्यंतरी संघटनेने डिजिटल स्वाक्षऱ्या करण्याचे आंदोलन देखील केले होते. मात्र वरिष्ठ अधिकारी केवळ आदेश देण्यापलीकडे काहीच करीत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी राज्यस्तरीय यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व्हरची क्षमता वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र त्यावर अद्यापही कसलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून बीड जिल्ह्यात फेरफारांचे काम ठप्प पडले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेकांचे बँकांचे व्यवहार देखील ठप्प पडले आहेत.

महसूलवरही परिणाम

ऑनलाईन फेरफार रखडल्यामुळे शेतजमीन खरेदी विक्रीवर देखील याचा परिणाम होत आहे. त्यामुळे खरेदी विक्रीतून शासनाला मिळणारा महसूल कमी झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी फेरफार आवश्यक आहेत. मात्र, ते मिळत नसल्यामुळे बॅंकेतील व्यवहार देखील ठप्प झाले आहेत.

Web Title: Online changes stalled for two months due to lack of mechanism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.