कांद्याने आणले डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:52+5:302021-02-05T08:24:52+5:30
सखाराम शिंदे गेवराई : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक कमी झाल्याने आणि भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने, गोरगरीब व मध्यमवर्गीयांच्या ...

कांद्याने आणले डोळ्यात पाणी
सखाराम शिंदे
गेवराई : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक कमी झाल्याने आणि भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने, गोरगरीब व मध्यमवर्गीयांच्या घरातून कांदा गायब झाला आहे. त्याचबरोबर, आता हाॅटेलमध्येही कांद्याऐवजी कोबी, टोमॅटो, काकडीचा वापर होताना दिसत आहे.
या कांद्याने अक्षरश: सामान्यांच्या तोंडची चवच पळविली आहे. कांदा न भाकर घेऊ द्या की रं, मला बी जत्रंला येऊ द्या की रं, असे गाणे फार वर्षांपूर्वी एका चित्रपटात होते. त्याप्रमाणे, कांदा सहज कोठेही उपलब्ध होत होता, तसेच शहरातील नव्हे, तर तालुक्यातील सर्वच हाॅटेल, भोजनालय, भेळ सेंटर, भज्यांच्या गाड्या यावर नेहमी मोठ्या प्रमाणात कांदा मिळत होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने भाव वाढले. आजमितीला बाजारात कांद्याचा भाव हा ४० ते ५० रुपये किलो दराने विकला जात असल्याने, गरीब व मध्यमवर्गीयांचा जेवणातील आवडता कांदा आता गायब झाला असून, फक्त श्रीमंताच्या घरात कांदा दिसत आहे.
आजमितीला शहरातील व ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणच्या भज्यांच्या गाडीवर आता कांद्याऐवजी कोबीचा वापर केला जात आहे, तसेच हाॅटेल, भोजनालय व भेळ सेंटरवरही कांद्याऐवजी कोबी, टोमॅटो, काकडी यांचा वापर होत असल्याने, हाॅटेलमध्येही सहज मिळणारा कांदा आता दिसेनासा झाला असल्याचे येथील अभिजीत ठाकूर, पप्पू जैस्वाल यांनी सांगितले.
कांद्याची आवक कमी झाल्याने व कांदा आम्हाला जास्त भावाने येत असल्याने, तो जास्त भावानेच विकावा लागत असल्याचे येथील व्यापारी विलास जंवजाळ यांनी सांगितले.