माजलगाव शिवसेनेतील जुना वाद पुन्हा उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST2021-08-17T04:39:26+5:302021-08-17T04:39:26+5:30
माजलगाव : शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या निवडीच्या मिरवणुकीत माझ्यासोबत बाचाबाची का केली होती, अशी विचारणा करत जुन्या ...

माजलगाव शिवसेनेतील जुना वाद पुन्हा उफाळला
माजलगाव
: शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या निवडीच्या मिरवणुकीत माझ्यासोबत बाचाबाची का केली होती, अशी विचारणा करत जुन्या वादाची कुरापत काढून शिवसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सावरगाव येथे घडली. याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख धनंजय (पापा) सोळंके यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुखदेव बाळासाहेब धुमाळ (वय ३६) हे दुचाकीवरून आपले चुलत भाऊ विजय वैजनाथ धुमाळ यांच्यासोबत सावरगाव येथे गेले होते. तेथे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी ते थांबले. यावेळी चुलत भावाला कोणीतरी आवाज दिल्याने ते तिकडे गेले असता माजलगाव शिवसेनेचे शहरप्रमुख धनंजय सोळंके हे सुखदेव धुमाळजवळ आले. आप्पासाहेब जाधव यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली त्या वेळेस माझ्याबरोबर बाचाबाची केली होतीस, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील सत्तुर मानेवर मारला.
धुमाळ यांनी तो हाताने अडवल्याने ते जखमी झाले. त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे रात्री उशिरा त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनंजय नरसिंहराव सोळंके यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दाभाडे हे करत आहेत.
माजलगाव शिवसेनेतील अंतर्गत वादावर शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी पडदा टाकला होता; परंतु या प्रकरणाने शिवसेनेतील जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.