तेलाचा भडका सुरूच, चहाचे चटके, कोबी, टोमॅटो गडगडले, ग्राहकीअभावी फळांचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:44+5:302021-01-04T04:27:44+5:30

बीड : दिवाळीपासून सुस्तावलेला किराणा बाजार मागील आठवड्यातही थंडच होता. मात्र, खाद्यतेलाच्या दरात दिवसेंदिवस वाढ सुरू आहे, तर पत्ती ...

Oil spills continue, tea cracks, cabbage, tomatoes crash, fruit prices stabilize due to lack of customers | तेलाचा भडका सुरूच, चहाचे चटके, कोबी, टोमॅटो गडगडले, ग्राहकीअभावी फळांचे भाव स्थिर

तेलाचा भडका सुरूच, चहाचे चटके, कोबी, टोमॅटो गडगडले, ग्राहकीअभावी फळांचे भाव स्थिर

बीड : दिवाळीपासून सुस्तावलेला किराणा बाजार मागील आठवड्यातही थंडच होता. मात्र, खाद्यतेलाच्या दरात दिवसेंदिवस वाढ सुरू आहे, तर पत्ती महागल्याने ग्राहकांना चहाचे चटके बसत आहेत. मंडईत मात्र मोठी आवक होत असल्याने भाज्या स्वस्त दरात मिळत आहेत. टोमॅटो, कोबीचे भाव गडगडले आहेत. फळांच्या बाजारात द्राक्षाचेही आगमन झाले सर्व फळांची आवक असताना ग्राहकी मात्र नव्हती‌. दिवाळीनंतरच्या संपूर्ण महिन्यात किराणा बाजारामध्ये मंदीसदृश स्थिती होती. लग्न तसेच गावोगावचे धार्मिक सप्ताह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होत असल्याने खाद्य वस्तूंना मागणी कमी होती. ग्राहकही गरजेच्या वस्तूंना प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. दहा दिवसांवर संक्रांत आलेली असतानाही बाजारात ग्राहकी सुस्त होती. दोन आठवड्यांपूर्वी घसरणीनंतर डाळींसह साखर शेंगदाण्याचे दर स्थिर होते. भाजी बाजारात मेथी, करडई, पालक व अन्य पालेभाज्यांची आवक जोरदार राहिली. त्यामुळे भाव सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात होते. नवीन कांदा आणि बटाट्याची आवक होत असल्याने दर चांगलेच उतरले आहेत. चंपाषष्ठीनंतर बाजारात वांग्याला मागणी वाढली. त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. टोमॅटो, कोबीचे भाव कमालीचे उतरले.

टोमॅटो १० रुपये किलो

मंडईत शेंगवर्गीय, वेलवर्गीय भाज्यांचे भाव २० ते ३० रुपये किलोपर्यंत होते. शेवग्याची शेंग मात्र ६० ते ८० रुपये किलो होती. कांदा, बटाटे, भेंडीचे भाव ३० रुपये किलो होते. मागील आठवड्याच्या तुलनेत वाटाणा शेंग किलोमागे पाच रुपयांनी घसरली. दर पंचवीस रुपये किलो होता. गाजराचे भाव ३० वरून २० रुपये किलो झाले. हिरवी मिरची किलोमागे २० रुपयांनी वधारली, तर टोमॅटो किलोमागे २० रुपयांनी घसरले.

डाळिंब, सफरचंद तेजीत

फळ बाजारात डाळिंब व सफरचंद १२० रुपये किलो होते. इतर फळांचे दर स्थिर होते. संत्रीची आवक चांगली असून, दर ३० ते ४० रुपये किलो होते. द्राक्ष १०० रुपये तर मोसंबी ५० ते ६० रुपये किलो होती. कलिंगड १० रुपये तर खरबूज ५० रुपये किलो होते. पपईचे दर १० रुपयांनी वाढले.

तेल तेजीत, चहा पोळतोय

खद्यतेलाच्या दरात उसळी सुरूच आहे. मागील आठवड्यात ११५ रुपयांवरून साेयाबीन तेल १२५ रुपये किलो झाले. १५ लिटरचा डबा १७५० वरून १९०० गेला होता, तर सूर्यफूल तेल १३० चे १४० रुपये किलो झाले. १५ लिटरचा डबा १९०० वरून २०५० रुपये झाला. चहापत्ती महिनाभरात किलोमागे १०० रुपयांनी वाढली. साखर, शेंगदाणे, डाळी स्थिर होत्या.

किराणा बाजारात डाळींचे भाव स्थिर आहेत. साखर, गुळाचे दर कमीच आहेत. खाद्यतेलात १५ लिटरमागे १३० ते १५० रुपये वाढ झाली. महिन्याचा पहिला आठवडा, संक्रांतीमुळे चांगल्या ग्राहकीची अपेक्षा आहे.

- महेश शेटे, किराणा व्यापारी

बाजारात सर्वच भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे पानकोबी, फ्लॉवर, टोमॅटोचे भाव सध्या कमी आहेत. वांग्याचे भाव मागणी वाढल्याने किलामागे दहा रुपये वाढले. मजूर वर्ग कारखान्याकडे गेल्याने ग्राहकी साधारण आहे.

-कैलास काळे, भाजी विक्रेता.

मंडईत दर्जेदार व ताज्या भाज्या स्वस्त मिळत आहेत. मोसमानुसार मिळणारे गाजर, मटार, मेथी व पालेभाज्यांची खरेदी करतो. कांदा, बटाट्याचे दरही कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

- किशोर गायकवाड, ग्राहक.

Web Title: Oil spills continue, tea cracks, cabbage, tomatoes crash, fruit prices stabilize due to lack of customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.