अधिकारी-कर्मचारी धावले एकमेकांवर लाठ्या-काठ्या घेऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:51+5:302021-07-02T04:23:51+5:30
बीड : नाथापूर येथील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणारी वाहने तहसील पथकाने ताब्यात घेतली होती. याप्रकरणी गुन्हे ...

अधिकारी-कर्मचारी धावले एकमेकांवर लाठ्या-काठ्या घेऊन
बीड : नाथापूर येथील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणारी वाहने तहसील पथकाने ताब्यात घेतली होती. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात देण्यात येणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करण्यावरून नायब तहसीलदार सुरेंद्र डोके आणि अव्वल कारकून युवराज नागरगोजे यांच्यात मोठा वाद झाला. मारामारी करण्यासाठी दोघांनी लाठ्या काठ्यांची तजवीज करून ठेवली होती. एकमेकांच्या डोक्यात काठ्या पडण्याआधीच तहसीलदार पोहोचल्याने हा वाद शमला. या प्रकारामुळे मात्र गुरुवारी बीड तहसील दिवसभर चर्चेत होते.
तालुक्यातील नाथापूर परिसरात अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, संबंधित वाहनचालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अव्वल कारकून युवराज नागरगोजे यांनी एक पत्र टिपणी टाकून तयार केले होते. त्यावर नायब तहसीलदार यांनीदेखील काही मुद्दे लिहून तहसीलदारांकडे स्वाक्षरी करण्यासाठी ते पत्र पाठवले. दरम्यान, तहसीलदारांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा अव्वल कारकून नागरगोजे हे ओसी घेण्यासाठी नायब तहसीलदार डोके यांच्याकडे गेले. दरम्यान, ओसीवर स्वाक्षरी वरिष्ठांनीच करावी, असा आग्रह डोके यांनी धरला व त्यानंतर माझी सही होईल, असे सांगितले होते.
या कारणावरून अव्वल कारकून युवराज नागरगोजे व नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. मोठा वाद सुरू झाल्यानंतर याची माहिती तहसीलदार शिरीष वमने यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पोहोचून दोघांचा वाद कोणत्या कारणावरून सुरू आहे, याची माहिती घेत, तो मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांच्यापुढेदेखील नागरगोजे व डोके यांचे बेशिस्त वर्तन कायम होते. एवढा मोठा वाद होण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे गैरवर्तन असेल तर, सर्वसामान्य नागरिकांच्या कामासंदर्भात तहसीलमधील अधिकारी, कर्मचारी कसे वागत असतील, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता.
व्हिडिओ झाला व्हारयल
नायब तहसीलदार सुरेंद्र डोके व अव्वल कारकून युवराज नागरगोजे यांच्या गुरुवारच्या वादाला जुन्या भांडणाची किनार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्यांच्या वादाचा व्हिडिओ एका सुजाण नागरिकाने ऑफिसच्या खिडकीतून मोबाइलवर शुट केला. वरिष्ठांसमोर झालेल्या या हमरी-तुमरीप्रकरणी दोघांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
भांडणासाठी लाठ्या-काठ्या आल्या तहसीलमध्ये
अव्वल कारकून व नायब तहसीलदारांचा वाद एवढा विकोपाला गेला होता, की त्यानंतर दोघेही मारामारी करण्यासाठी लाठ्या-काठ्या घेऊन तहसील कार्यालयात आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. तहसीलदारांनी दोघांमध्ये मध्यस्थी करून वाद मिटवल्यामुळे पुढील प्रकार घडला नाही.
कार्यालयात वाद सुरू झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिथे जाऊन दोघांचे म्हणणे समजून घेत, वाद मिटवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील याची कल्पना दिली आहे.
शिरीष वमने, प्रशिक्षणार्थी तहसीलदार बीड
010721\01_2_bed_15_01072021_14.jpg
कार्यालय बाचाची कताना अव्वल कारकून युवराज नागरगोजे व नायब तहसीलदार सुरेंद्र डोके