ग्राम समित्यांच्या दुर्लक्षतेमुळे कोरोनाचा आकडा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:33+5:302021-07-12T04:21:33+5:30
कडा : जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आष्टी तालुक्यात आढळून येऊ लागल्याने प्रशासनही कामाला लागलेले दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता ...

ग्राम समित्यांच्या दुर्लक्षतेमुळे कोरोनाचा आकडा वाढला
कडा : जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आष्टी तालुक्यात आढळून येऊ लागल्याने प्रशासनही कामाला लागलेले दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता तालुकावासीयांची धाकधूक वाढली असताना यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या ग्राम सुरक्षा समितीचे मात्र गावोगावी दुर्लक्ष असल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आष्टी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसून बाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्याऐवजी घरीच थांबत आहेत. एवढेच नव्हे तर बंद मोबाइल नंबर देणे, चुकीचा पत्ता देणे, असे प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या नाकीनव आले आहेत. या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या ग्रामसुरक्षा समित्यांना कसलेच गांभीर्य दिसून येत नाही. गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला तर त्याला कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी पाठवणे, त्याची नोंद लगेच आरोग्य विभागाला देणे, तो रुग्ण घरीच थांबला तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित समितीला देण्यात आले आहेत. पण आपलाच माणूस कशाला कटकट, होणाऱ्या वादामुळे समितीत असणारे जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच तालुक्यातील कोरोना उतरणीला लागत नसल्याचे दिसू येत आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या समित्या व आडमुठेपणा करणाऱ्या रुग्णांवर कारवाई करण्याची मागणी शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केली आहे.
याबाबत आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ग्रामसुरक्षा समितीला सक्त सूचना केल्या असून, या समितीने कामात दिरंगाई केल्यास ग्रामसेवक, सरपंच, व समिती सदस्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर रुग्ण घरी थांबला तर वेळप्रसंगी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.