आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:48+5:302021-06-28T04:22:48+5:30
अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनाच्या डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड ...

आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद
अविनाश मुडेगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोनाच्या डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. पूर्वीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाले आहे. अंबाजोगाई शहरातही आता सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत, तर शनिवार आणि रविवार अर्थात वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या शहरातील सुमारे ७२ हॉटेल व्यावसायिकांचे तसेच या व्यवसायात गुंतलेल्या सुमारे हजारों कर्मचाऱ्यांचे नुकसान तर होणार आहेच, शिवाय अंबाजोगाईकरांना आपला वीकेंड पुन्हा घरातच घालवावा लागणार आहे.
राज्य सरकारने डेल्टाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढून, काय सुरू राहणार, काय बंद राहणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील हॉटे्स ही सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यानंतर चारनंतर पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. शनिवारी आणि रविवारी हॉटेल्स पूर्णपणे बंद राहणार आहेत. या दिवशी पार्सल सुविधा मात्र सुरू राहणार आहे. निर्बंध कडक केल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या हॉटेल, बारमध्ये २० पासून ते ४० कर्मचारी कामाला आहेत. त्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावावरून कामासाठी आणले आहे. काही कामगार तर दोन दिवसांपूर्वीच आले आहेत. आता गावावरून कामगारांना बोलावण्यात आल्याने त्यांचा पगार, लाईट बिल, टॅक्स, जीएसटी आदींसह इतर खर्च हा करावाच लागणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सहा महिन्यांनंतर आता कुठे आमचा व्यवसाय हळूहळू सुरू होत होता. त्यात आता पुन्हा निर्बंध लादल्याने व्यवसायावर परिणाम होणार आहेत. आम्हाला दुपारपासून ते रात्रीपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांमधून होत आहे.
प्रतिक्रिया-:
शनिवार व रविवारी हॉटेल पूर्णपणे बंद राहणार. अशा स्थितीत हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार? आता कुठे आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली होती. एक एक करून कर्मचारी गावावरून आणला जात होता. त्यात पुन्हा निर्बंध कडक केल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. बँकेचे कर्ज, कर्मचाऱ्यांचा पगार, लाईट बिल आदींसह इतर होणारे खर्च हे करावेच लागणार आहेत. त्यामुळे भविष्यात हॉटेल पुन्हा सुरू झाल्यास किमान दोन वर्षे सावरण्यासाठी जाणार आहेत.
- विनोद पोखरकर, हॉटेल व्यवसायिक.
...
इतर व्यवसाय योग्य पद्धतीने सुरू आहेत. हॉटेल व्यावसायिकांचा धंदाच दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला किमान दुपारनंतर रात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनने केली आहे. त्यातही आता कुठे व्यवसाय सुरू होत असताना, पुन्हा निर्बंध लादल्याने हा व्यवसाय पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
- प्रशांत शेट्टी, हॉटेल व्यावसायिक.
...
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
मागील वर्षभर काम नसल्याने मी गावालाच होतो. आता कुठे दोनच दिवसांपूर्वी मालकाने मला तिकीट पाठवून बोलावून घेतले आहे. परंतु मागील वर्षभर काम नसल्याने खूप हालाकीचे दिवस सहन केले आहेत. त्यामुळे आता हाताला काम आल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करेन, अशी अपेक्षा होती. परंतु, आता पुन्हा आमचे हालच होणार आहेत.
- एक कामगार.
....
मागील वर्षभर तसे हालच सुरू आहेत. सहा महिने हॉटेल मालकाने पोसले. त्यानंतर गावाला गेलो. पुन्हा लॉकडाऊन शिथिल होण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी गावावरून आलो. कामाला लागलो. पण आता पुन्हा निर्बंध कडक केल्याने पुन्हा आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचे हालच होणार आहेत.
- एक कामगार.
....
शहरातील एकूण हॉटेल्स - ७७
हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी - १४००
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने
मुळात हॉटेलचा व्यवसाय हा दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू राहिले तरी त्याचा उत्पन्नाला फटकाच बसणार आहे. हॉटेल सुरू असले तरी बंद असल्यासारखेच असणार आहे. त्यात इतर खर्च हे करावेच लागणार आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय भविष्यात राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.