गडावरून ‘राजकारण’ नाही - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:49 IST2018-02-16T00:48:00+5:302018-02-16T00:49:45+5:30
मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

गडावरून ‘राजकारण’ नाही - पंकजा मुंडे
बीड : मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नारायणगडावरील विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाधिपती महंत शिवाजी महाराज, शिवस्मारक समिती, मुंबईचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक आ. विनायक मेटे, माजीमंत्री सुरेश धस, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ.आर.टी. देशमुख, माजी आ. बदामराव पंडित, जि.प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, राजेंद्र मस्के, अशोक हिंगे, मंदिर विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सभापती संतोष हंगे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना गडाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मेटे यांचे आभार मानले. निवडणुकीत ठरल्याप्रमाणे इतर घटक पक्षांना मंत्रीपद मिळाले, परंतु आ. विनायक मेटे यांनाही मंत्रीपद द्यावे, अशी विनंती केली होती.
मुख्यमंत्र्यांचे सहकार्य : विकास करणार
पंकजा मुंडे म्हणाल्या, हा जिल्हा गडांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या गडांना मानणारा वारकरी संप्रदायही मोठा आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गडांवर येणा-या भाविकांची संख्याही मोठी असते. या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने निधी उपलब्ध करुन दिला असून, यातून विविध विकास योजना पूर्ण केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जे-जे प्रस्ताव मी घेऊन गेले त्यास त्यांनी मंजुरी दिली, असे यावेळी सांगितले.