धोकादायक इमारतींची नोंद बीड नगर परिषदेकडे नाहीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:59 IST2019-07-31T23:57:33+5:302019-07-31T23:59:43+5:30
बीड शहरातील पेठबीड भागात जुन्या इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, बीड शहरातील धोकादायक इमारतींची बीड पालिकेकडे नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धोकादायक इमारतींची नोंद बीड नगर परिषदेकडे नाहीच !
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड शहरातील पेठबीड भागात जुन्या इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, बीड शहरातील धोकादायक इमारतींची बीड पालिकेकडे नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गंभीर असतानाही पालिका याबाबत अनभिज्ञच आहे. विशेष म्हणजे नगर रचना विभाग, बांधकाम व स्वच्छता विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवित हात झटकत आहेत.
बीड शहरात जुन्या लोकांनी बांधलेली माळवद, विटा मातीची घरे आजही अनेक ठिकाणी आहेत. मोठा पाऊस झाला किंवा वादळ वारे सुटले तर या इमारतींना अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते. या इमारती पाडण्याची गरज आहे. परंतु बीड पालिकेला बीड शहरात किती इमारती धोकादायक आहेत, याचीच माहिती नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.
भीती!
बीड शहरात सर्वत्र टोलेजंग इमारती अनधिकृतपणे उभारल्या जात आहेत. याकडेही बीड पालिका ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. या इमारतींवर कारवाई करण्यास आखडता हात घेतल्याचे वारंवार समोर आल्याने कामाकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एकमेकांकडे दाखविले बोट
धोकादायक इमारतींच्या माहितीसाठी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपण बाहेर असल्याचे सांगून अभियंत्यांकडून माहिती घेण्यास सांगितले. बांधकाम अभियंता रेवनवार यांनी स्वच्छता विभागाकडे बोट दाखविले. स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी तिडके यांनी नगर रचना विभागाचे नाव सांगितले. नगर रचना विभागात विचारणा केल्यावर त्यांनी पुन्हा स्वच्छतेकडे बोट दाखविले.