आष्टीत कोरोनाबाधित रुग्ण सापडेनात; यंत्रणेची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:50+5:302021-07-12T04:21:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आष्टी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण यंत्रणेची चांगलीच दमछाक करत असल्याचे उघड झाले आहे. बहुतांश रुग्णांनी ...

आष्टीत कोरोनाबाधित रुग्ण सापडेनात; यंत्रणेची दमछाक
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आष्टी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण यंत्रणेची चांगलीच दमछाक करत असल्याचे उघड झाले आहे. बहुतांश रुग्णांनी चुकीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिल्याने त्यांचा शोध घेणे कसरतीचे ठरत आहे. मागील दोन दिवसांपासून आष्टी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी रुग्णांचा शोध घेण्यासाठी मागावर आहेत. अद्यापही १० पेक्षा जास्त रुग्ण सापडले नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सध्या आष्टी तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे समोर आले आहे. येथील कोरोना आटोक्यात येत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार हे आष्टीचा आढावा घेत आहेत. तसेच नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. असे असले तरी या तालुक्यातील लोक खोटी व चुकीची माहिती देत असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात बंदी असतानाही ७० लोक घरातच असल्याचे उघड झाले होते. ८७ लोकांचा मोबाइल बंद होता. त्यामुळे ते शोधण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश सीईओ कुंभार व डॉ. पवार यांनी दिले होते.
दरम्यान, शनिवारी आढळलेले ८१ रुग्ण सीसीसीमध्ये दाखल केल्याचा दावा प्रशासन करीत असले, तरी शुक्रवारपर्यंतचे जवळपास १० रुग्ण अद्यापही प्रशासनाला सापडलेले नाहीत. रविवारी दुपारपर्यंत त्यांची शोधमोहीम सुरूच असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या चुकीच्या माहितीमुळे यंत्रणेची धावपळ होत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डीएचओ डॉ. पवार यांनी केले आहे.
....
अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही रुग्ण घरातच
आष्टी तालुक्यातील काही गावांत कोरोना चाचणी केली. याठिकाणी एखादी व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्यावर तिला तत्काळ सीसीसी अथवा रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे अथवा सुरक्षितस्थळी विलगीकरण करणे गरजेचे आहे. परंतु, ढिसाळ नियोजनामुळे आणि महसूल, पोलिसांची अनुपस्थिती असल्याने बाधित रुग्ण घरी जाऊन बसत आहेत. शनिवारी हा प्रकार एका गावात दिसला. जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना हे समजताच त्यांनी या सर्वांना बाहेर काढत सीसीसीमध्ये दाखल केले. अशा ढिसाळ नियोजनामुळेच आष्टीत संसर्ग वाढत आहे.
--
पॉझिटिव्ह रुग्ण दाखल करण्यास थोडाफार उशीर झाला असेल. शनिवारचे सर्व रुग्ण सीसीसी, रुग्णालयात दाखल केले आहेत. त्या अगोदरच्या रुग्णांनी खोटा पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला. त्यामुळे त्यांचा शाेध लागत नाही. आम्ही प्रयत्न करतच आहोत.
-सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी, आष्टी
--
घरात असलेल्या ७० रुग्णांना सीसीसीमध्ये दाखल केले आहे. तसेच मोबाइल बंद असलेल्या आणि चुकीचा पत्ता असलेल्या काही लोकांचा शोध घेतला आहे. इतरांचा सुरू आहे. यापुढे चुकीची माहिती टाळण्यासाठी चाचणीच्या ठिकाणीच मिसकॉल आणि आधारकार्ड तपासले जात आहे.
-डॉ. नितीन मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, आष्टी
110721\11_2_bed_12_11072021_14.jpeg
लोकमतने रविवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर यंत्रणेकडून शोध मोहिम अधिक गतिमान करण्यात आली होती.