जेवायला येतो म्हणालेला नितीन घरी परतलाच नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:26+5:302021-03-13T04:59:26+5:30
अंबाजोगाई : शहरातील मंगळवार पेठेतील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या नितीन उर्फ बबलू कैलास साठे (३८) याला त्याच्या आईने बुधवारी रात्री ...

जेवायला येतो म्हणालेला नितीन घरी परतलाच नाही..
अंबाजोगाई : शहरातील मंगळवार पेठेतील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या नितीन उर्फ बबलू कैलास साठे (३८) याला त्याच्या आईने बुधवारी रात्री ११.३० वाजता कॉल करून जेवणासाठी घरी बोलावले. परंतु थोड्या वेळात येतो म्हणालेला नितीन घरी परतलाच नाही. थोड्यावेळाने भांडणात गंभीर जखमी झालेल्या नितीनला स्वाराती रुग्णालयात नेल्याचे त्याच्या मित्राने आईला सांगितले. आईने रुग्णालयात धाव घेतली, परंतु तिथे तिला मुलाचा मृतदेहच पहावयास मिळाला.
बुधवारी मध्यरात्री झालेल्या नितीन साठेच्या खुनाच्या घटनेने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.
२० फेब्रुवारी रोजी नितीन आणि शुभम रमेश लोमटे यांच्यात वाद झाला होता. २३ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात समझोता झाला आणि शुभम लोमटे याने शंभर रुपयांच्या बॉंडवर लिहून दिल्यानंतर हा वाद मिटला. या प्रकरणात साक्षीदार म्हणून राहुल दिलीपराव शेळके आणि लखन सुंदरराव जगदाळे यांनी सह्या केल्या होत्या. त्यानंतर बुधवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास मंगळवार पेठेतील हनुमान पारच्या जवळ त्यांच्यातील जुना वाद उफाळून आला. यावेळी शुभम लोमटे, राहुल शेळके आणि लखन जगदाळे या तिघांनी दगडाने तोंडावर मारून नितीनचा खून केला असे त्याची आई मंगल कैलास साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर ॲट्राॅसिटी कायद्यासह खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये करत आहेत.
दोन आरोपी अटकेत, एक फरार
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी जायभाये, पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत राहुल शेळके आणि लखन जगदाळे या दोघांना रात्रीतून ताब्यात घेतले. शुभम लोमटे सध्या फरार असूनपोलीस पथक त्याचा त्याचा शोध घेत आहेत.
नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार
दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंतही शुभम लोमटेला अटक झालेली नसल्याने संतप्त नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. शुभमला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. डीवायएसपी जायभाये यांनी दोन दिवसाच्या आता फरार आरोपीला अटक करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी नितीनचा मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी ५ वाजता नितीनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीनच्या पश्चात वडील, होमगार्ड असणारी आई, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दहा दिवसात दोन खुनांमुळे अंबाजोगाई स्तब्ध
दहा दिवसापूर्वी शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात गणेश मोरे या तरुणाचा भर रस्त्यात निर्घुण खून करण्यात आला. या घटनेच्या धक्क्यातून शहर सावरत असतानाच बुधवारी मध्यरात्री नितीन साठेचा खून झाला. एरवी शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई शहराच्या प्रतिमेवर या दोन घटनांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
===Photopath===
110321\112_bed_28_11032021_14.jpg~110321\112_bed_27_11032021_14.jpg
===Caption===
Khoon~अंबाजोगाईत नितीन साठे याचा खून करण्यात आला. यातील आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.