गुन्हेगारीतही नवीन चेहरे, कोरोनाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:10+5:302021-06-22T04:23:10+5:30
कोरोनाने दीड वर्षांपासून सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होण्यासाठी अद्याप काही काळ जावा लागणार आहे. मागील वर्षीपासून ...

गुन्हेगारीतही नवीन चेहरे, कोरोनाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी
कोरोनाने दीड वर्षांपासून सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होण्यासाठी अद्याप काही काळ जावा लागणार आहे. मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी निर्बंध व लॉकडाऊन करण्यात आला. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी, इतर व्यवसाय मात्र ठप्प होते. संचारबंदीचे आदेश असल्यामुळे आवश्यक कारणास्तव कोणीही बाहेर पडत नव्हते. या काळात उद्योग व व्यावसाय बंद असल्यामुळे बहुतांश जणांच्या हातचे काम गेले होते. अनेकांची उपासमार देखील झाली. त्याचदरम्यान या काळात गुन्हेगारीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
गेल्या पाच महिन्यांत बीड जिल्ह्यात ६१६ ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी १८८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस प्रशासनाला यश देखील आले आहे. दरम्यान, अनेक गुन्हे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. ज्या गतीने तपास होऊन आरोपींना अटक होण्यासह त्यांना शिक्षा होण्यासाठी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम देखील त्याच गतीने होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, चोऱ्या असे प्रकार वाढले आहेत. जिल्ह्यात दुचाकी चोरी व मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, त्यासंदर्भात मोठी कारवाईदेखील करण्यात आलेली आहे. परंतु, मोठी टोळी सक्रिय असल्याचे चित्र असून, दररोज विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत आहेत. दरम्यान, मोबाइल व दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यापूर्वी दोन ते तीन दिवस त्या वस्तूचा शोध घेण्यास सांगून पुन्हा गुन्हा दाखल करून घेतल्याचे प्रकार देखील काही ठिकाणी घडल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आले.
गुन्हेगारीमध्ये नवे चेहरे का आले?
गुन्हेगारीत नव्यानेच आलेल्या अनेकांमध्ये गरिबी, बेरोजगारी व संगतगुण या गोष्टी कारणीभूत दिसून येत आहेत.
संधी साधून चोऱ्या करणे सहज सोपे असल्याने या गुन्ह्यात अनेक जण पाय रोवू पाहत आहेत.
काही तरुण नशा करण्यासाठी किंवा करून चोऱ्या व जबरी चोऱ्या करत असल्याचे चित्र आहे.
खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार
इतर गुन्ह्यांच्या तुलनेत घरफोड्या, जबरी चोरी, चोरी, दरोडे हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ज्या सक्रिय टोळ्या आहेत, त्यामध्ये खबरे वाढवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
काळजी घेणे गरजेचे
जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले नाही. नवीन चेहरे शोधण्यासाठी विविध उपाययोजना आवश्यकतेनुसार केल्या जातात. नागरिकांनी देखील स्वत: काळजी घ्यावी, नवीन व्यक्ती किंवा काही घटना घडल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा.
आर. राजा पोलीस अधीक्षक बीड
रेकॉर्डवरचे गुन्हेगारच जास्त आहेत
कोरोनाच्या काळात उपासमारीमुळे गुन्हेगार वाढले, असे निदर्शनास आलेले नाही. ज्याचं रेकॉर्ड आहे असेच गुन्हेगार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काही नवीन लोकांना शोधण्यासाठी नवीन खबरे नेमणे किंवा तांत्रिक बाबीचा वापर वाढवला असून, पुढील काळात बहुतांश गुन्हे उघडकीस येतील.
भारत राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख असा
प्रकार २०१९ २०२० २०२१ मे अखेर
चोरी ६९० ६८६ ४९४
घरफोडी १५१ २१७ ९२
खून ५४ ५३ २४