कृषी योजनांची माहिती देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:47+5:302021-03-18T04:33:47+5:30
अंबाजोगाई : कृषी क्षेत्रासंबंधी विविध योजना कृषी पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. परंतु, याची योग्य माहिती शेतकऱ्यांना मिळत ...

कृषी योजनांची माहिती देण्याची गरज
अंबाजोगाई : कृषी क्षेत्रासंबंधी विविध योजना कृषी पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. परंतु, याची योग्य माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. कृषी यांत्रिकीकरण योजनेसह जमीनसुधार योजना, फळबाग लागवड अशा योजनांतून शेतकरी दरवर्षी सहभागी होतात. यातून शेतीची प्रतवारी वाढण्यास मदत होते. यावर्षी कृषी विभागाने सर्वच योजनांचा समावेश पोर्टलवर करून ऑनलाइन अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना सूचित केले आहे. मात्र, या योजनांबाबत तालुका कृषी कार्यालयाकडून कसलीही जनजागृती होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
चाऱ्याची साठवण
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. डोंगराळ भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने चारा साठवण करण्याची तयारी सुरू झाली आहे. घरोघरी कापण्यात आलेला ज्वारीचा कडबा झोपडीसारखा उंचावर रचून त्याचा साठा केला जात आहे. उन्हाळ्यात हिरवा चारा कमी झाल्यानंतर गुरांना कोरडा कडबा देत त्यांचे संगोपन केले जाते.
पेट्रोल चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : एकीकडे पेट्रोलचे दर वाढल्याने दुसरीकडे पेट्रोल चोरीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी दुचाकीमधून पेट्रोलची चोरी झाल्याच्या घटना अनेक घटना समोर आल्या आहेत. पेट्रोलची चोरी करणाऱ्या चोरांना पायबंद घालण्यासाठी आता नागरिकच सरसावले आहेत.
समृद्ध गाव स्पर्धेच्या कामांना वेग
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अनेक गावांनी सहभाग नोंदविला आहे. या गावांमध्ये आता स्पर्धेच्या कामांनी मोठा वेग घेतला आहे. प्रामुख्याने कंपोस्ट खतनिर्मितीसह जलसंधारणाची कामे लोकसहभागातून केली जात आहेत. आपले गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी व शेतीचा दर्जा वाढविण्यासाठी ही स्पर्धा शेतक-यांसाठी दिशादर्शक ठरू लागली आहे.
लिंबांची विक्री वाढली
अंबाजोगाई : उन्हापासून गारवा मिळवण्यासाठी उन्हाळ्यात घरोघरी लिंबूसरबत केले जाते. त्यामुळे बाजारात सध्या लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंबाजोगाईच्या बाजारपेठेत सध्या ताजे लिंबू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. कोरोनाच्या कालावधीत सी व्हिटॅमिन म्हणूनही घरोघरी लिंबाची मागणी वाढल्याने भावही वधारले आहेत.