नाकर्त्या आमदारामुळे मतदारसंघ मागे पडला- अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:10 IST2018-01-19T00:10:22+5:302018-01-19T00:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मी मंत्री असतांना माजलगांव तालुक्यात भरभरुन कामे दिली. त्यामुळे तालुक्याचा विकास ...

नाकर्त्या आमदारामुळे मतदारसंघ मागे पडला- अजित पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मी मंत्री असतांना माजलगांव तालुक्यात भरभरुन कामे दिली. त्यामुळे तालुक्याचा विकास झाला मात्र, आम्ही आणलेली कामे, नोक-या आमदारामुळे धडाधड रद्द होत आहेत. दुसरीकडे एकतरी मोठे विकासाचे काम केलेले या आमदाराने दाखवावे असे म्हणत माजलगांव मतदार संघ पाच वर्ष मागे पडला असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल सभेत केले.
येथील मोंढा मैदानात झालेल्या हल्लाबोल प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, माजीमंत्री प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, आ. सतिष चव्हाण, आ. विद्या चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. अमरसिंह पंडित, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, वावटळीत ज्यांची लायकी नाही असे लोक आमदार, खासदार झाले त्यात माजलगावच्या आमदाराचाही नंबर येतो.
जळगावचे आमदार परळीला राहून माजलगांवचा कारभार हाकतात हे गहजब मी पहिल्यांदाच पाहतोय, असा टोलाही पवारांनी लगावला. हल्लाबोल सभेच्या निमित्ताने येथील माऊली फाटा येथून तीन हजार मोटार सायकलची रॅली माजलगाव शहरापर्यंत काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.