बीड : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण राज्यभर गाजले. यासह आठवडाभरात परळीतील उद्योजक अपहरण, बीडमधील गोळीबार, मस्साजोगमधीलच खंडणी प्रकरण आदी घटनांमुळे बीड आहे की बिहार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. बीडमधील सरपंच हत्यासह इतर मुद्दे जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधी आमदारांनी अधिवेशनात उपस्थित केले. या सर्वांच्या बोलण्यातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे दिसले. त्यामुळेच शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविनाश बारगळ यांची बदली करत असल्याचे सभागृहात जाहीर केले. या पदावर आता छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून कार्यरत आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत याची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बारगळ यांची नियुक्तीचे आदेश नंतर निघणार असल्याची माहिती आहे.
नंदकुमार ठाकूर यांची बदली झाल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी अविनाश बारगळ यांची पोलिस अधीक्षक म्हणून नियूक्ती झाली. पदभार घेताच त्यांनी अनेक मोहीम राबवत जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण केला. विधानसभा निवडणूक अनुषंगाने अनेक प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या. परंतु निवडणुकीनंतर जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडत गेला. पोलिसांनी राजकीय दबावापोटी काही खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जिल्ह्यातील आमदारांनी केला. त्यानंतर लगेच केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. त्या पाठोपाठ लगेच बीड शहरात गोळीबार झाला, परळीत अमोल डुबे या उद्योजकाचे अपहरण झाले. त्यानंतर मस्साजोगमधील पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन काेटींची खंडणी मागण्यात आली. यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे नाव आहे. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हेच सर्व मुद्दे हिवाळी अधिवेशनात गाजले. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी या सर्व प्रकरणांवर आवाज उठवला. हे सर्व पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारगळ यांची बदली करत असल्याचे सभागृहात सांगितले. त्यामुळे आता नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या समोर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
४ महिन्यांतच बदलीअविनाश बारगळ यांनी ७ ऑगस्ट २०२४ रोजी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी अनेक कारवाया करून गुन्हेगारांमध्ये वचक तर सामान्यांमध्ये सन्मानाची भावना तयार केली होती. परंतु त्यानंतर जिल्ह्यातील दबदबा कमी होत गेला. अनेक ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप झाला. त्यामुळेच त्यांची फडणवीस यांनी बदली करण्याचा निर्णय घेतला. बारगळ हे जिल्ह्यात ४ महिने १३ दिवस राहिले. २० डिसेंबरला त्यांच्या बदलीची घोषणा झाली.
सुदर्शन घुले, वाल्मीक कराडला अटक नाहीमस्साजोग हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी आवाज उठवला. पोलिस अधीक्षक बारगळ यांनीही या प्रकरणाला सुरुवातीपासून गांभीर्याने घेतले नाही. आरोपी अटकेची सर्व जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेवर दिली. या शाखेनेही त्यांना अटक केली नाही. त्यामुळेच बारगळ यांच्याविरोधात रोष वाढत गेला. एलसीबीवरच अवलंबून न राहता जिल्ह्यातील नेवटर्क असलेल्या इतर पोलिसांची मदत घेतली असती तर हे आरोपी अटक झाले असते. परंतु बारगळ यांनी तसे केले नाही. आणि त्यांच्या अंगलट आले.