राष्ट्रवादीत शह-काटशह
By Admin | Updated: February 26, 2017 00:54 IST2017-02-26T00:53:34+5:302017-02-26T00:54:39+5:30
बीड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २५ सदस्यांसह सत्तेच्या काठावर पोहचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह-काटशहाच्या राजकारणाने वेग घेतला आहे.

राष्ट्रवादीत शह-काटशह
प्रताप नलावडे बीड
जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २५ सदस्यांसह सत्तेच्या काठावर पोहचलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह-काटशहाच्या राजकारणाने वेग घेतला आहे. सत्तास्थापनेसाठी कोणाचा पाठिंबा मिळवायचा आणि अध्यक्षपदाचा मुकूट कोणाच्या डोक्यावर ठेवायचा यावरून हायकमांडकडे स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे आपले महत्त्व दाखवून देण्यास सुरूवात केली आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या मंगल सोळंके यांचे पती माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी शुक्रवारी रात्रीच बारामती गाठली आहे. माजलगावातील ६, वडवणीतील १ व धारूरमधील २ अशा ९ नवनिर्वाचित सदस्यांनाही त्यांनी सोबत नेले आहे. माजलगावात भाजपचा सफाया केल्यानंतर सोळंकेंचा अध्यक्षपदावरील दावा बळकट झाला आहे. शिवाय, यापूर्वी माजी मंत्री सुरेश धस, आ. अमरसिंह पंडित यांच्या गटाला लाल दिवा मिळाला होता. त्यामुळे सोळंके यांनी अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
दुसरीकडे, माजी मंत्री सुरेश धस यांना होमपीचवर दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पत्नी संगीता धस यांनाही विजयश्री खेचून आणता आली नाही. या उपरही श्रेष्ठींकडे सर्वात आधी पोहचण्यासाठी धस हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काकू-नाना आघाडीला राकाँकडे वळविण्याची रणनिती आखली आहे. मात्र, त्याला काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. एकूणच राकाँतील गटबाजी भाजपच्या पथ्यावर पडू शकते असे चित्र पहावयास मिळत आहे.