नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:42+5:302021-07-12T04:21:42+5:30
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव ...

नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी या गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. रस्त्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
कलावंतांना नियमित मानधन मिळावे
बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक लोककलावंत दयनीय अवस्थेत जगत आहेत. त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. वयोवृद्ध कलावंतांना वेळेवर मानधन मिळावे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत, अशी मागणी होत आहे.
पेट्रोल दरवाढीमुळे वाहन चालकांना त्रास
बीड : पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहन चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून होत आहे.
बांधकाम साहित्य रस्त्यावरच
पाटोदा : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी, शहरवासीयांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत. यामुळे लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज
बीड : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पुन्हा स्वच्छता अभियान राबवून, त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.