गावचे नाव ‘खडक’वाडी; पण प्रेरणादायी संस्काराची पंढरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:36+5:302021-01-10T04:25:36+5:30
एका टेकडीवरील अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीचे हे छायाचित्र. छाया : अनिल गायकवाड अनिल गायकवाड कुसळंब ...

गावचे नाव ‘खडक’वाडी; पण प्रेरणादायी संस्काराची पंढरी!
एका टेकडीवरील अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीचे हे छायाचित्र. छाया : अनिल गायकवाड
अनिल गायकवाड
कुसळंब (जि.बीड) : ‘नावात काय असतं, असं म्हटलं जातं; किंबहुना अगदी त्याच अनुषंगाने गावाचं नाव खडकवाडी असलं तरी या भूमीतून शेकडो तरुण विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध प्रशासनातील क्षेत्रात उत्तुंग कार्य करीत या भूमीचा नावलौकिक वाढवीत आहेत. अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीच्या तरुणांनी शेती क्षेत्र अत्यंत कमी असल्याने व त्यामुळे ऊसतोडीशिवाय पर्याय नसल्याने स्वतःला अभ्यासात गाडून घेतले आणि या भूमीचा नावलौकिक वाढविला.
बीड- कल्याण महामार्गावरील खडकवाडी (ता. पाटोदा) हे छोटेसे टुमदार गाव. एका टेकडीवर वसलेले आहे. गावाला अल्प क्षेत्र असल्याने ऊसतोडीशिवाय त्यांना पर्याय नव्हता आणि म्हणून येथील तरुणांनी लहानपणापासूनच प्रचंड कष्ट घेत शाळा-महाविद्यालयात शिकून प्रशासनातल्या विविध क्षेत्रांत जाऊन गावचा इतिहास बदलला!
आजपर्यंत या गावातील तरुणांनी शिपायापासून ते कलेक्टरपर्यंत मजल मारली आहे. गावचे भूमिपुत्र निवृत्त जिल्हाधिकारी बी.डी. सानप यांनी कानिफनाथांच्या आशीर्वादाने गावचा झेंडा महाराष्ट्राच्या क्षितिजावर नेऊन पोहोचविला. शिक्षक, प्राध्यापक, सैनिक, पोलीस, बांधकाम, कृषी शिक्षण, आदींसह आरोग्य, तसेच विविध क्षेत्रांत येथील तरुण महाराष्ट्रभर आणि देशात कार्यरत आहेत. उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता आणि हीच गरज त्यांना यशापर्यंत नेऊ शकली.
दूधविक्री न करण्याची परंपरा!
गावामध्ये दूध-दही विक्री न करण्याची परंपरा आहे. विविध जाती, धर्म, पंथ गुण्यागोविंदाने नांदतात. सात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेने २७ एकर गावच्या जागेमध्ये कंपाउंड करून उत्कृष्ट विविध फळझाडांची वनराई खडकावर फुलविली आहे! एमआरईजीएसच्या माध्यमातून चार हजार वृक्षांची लागवड केली. यात साडेसहाशे झाडांची डाळिंबाची लागवड, तसेच चिंच, आवळा, आंबा, सीताफळ, लिंबोणी आदी फळांची झाडेही गावची शोभा वाढवीत आहेत. यंदा येथूनच चार टन डाळिंबाची विक्री झाली आहे!
प्रा. संजय सानप
(माजी सरपंच, खडकवाडी)
‘कानिफनाथ’ देवस्थान गावचे श्रद्धास्थान!
कानिफनाथांचे सुंदर भव्यदिव्य मंदिर गावच्या टेकडीवर उभारले असून, गावच्या वैभवात भर घालत आहे. श्रावण महिन्यात सप्ताह होतो. नोव्हेंबरमध्ये प्राणप्रतिष्ठा असते. गावात माडी बांधत नाहीत. बैलांना नाल ठोकत नाहीत, तसेच सिंगांना सेंबीही नसते, तसेच घरात सनलाही मारला जात नाही. या काही गावच्या प्रथा आहेत.
२००२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारणी करण्यात आली आहे. यावेळी हभप निगमानंद महाराज मायंबा आणि गावचे भूमिपुत्र तत्कालीन जिल्हाधिकारी बी.डी. सानप, तसेच रामकृष्ण बांगर आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला होता.
वृक्ष लागवड अन् अभ्यासिका!
कानिफनाथ मंदिरालगत प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली असून, मंदिरालगत अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिकागृह बांधण्यात आले आहे. महंत हभप लक्ष्मण महाराज फड यांच्या मार्गदर्शनातून अध्यात्म विचारांचा सुंदर आविष्कार आणि संस्काररूपी लोकशिक्षणाचा प्रसार केला जात आहे. २००२ मध्ये मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमापासून येथील कित्येक वर्षांपासून बोकड कापण्याची अर्थात कंदुरीचा प्रकार बंद केला आहे.