मांजरसुंबा घाटात तरुणाचा खून; संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:03+5:302021-06-30T04:22:03+5:30

बीड : तालुक्यातील लिंबागणेश येथील तरुणाचा संशयास्पद मृतदेह मांजसुंबा घाटात सोमवारी रात्री उशिरा आढळून आला होता. तो अपघात ...

Murder of a youth in Manjarsumba Ghat; In the custody of the suspect | मांजरसुंबा घाटात तरुणाचा खून; संशयित ताब्यात

मांजरसुंबा घाटात तरुणाचा खून; संशयित ताब्यात

बीड : तालुक्यातील लिंबागणेश येथील तरुणाचा संशयास्पद मृतदेह मांजसुंबा घाटात सोमवारी रात्री उशिरा आढळून आला होता. तो अपघात असल्याचा बनाव करून खून केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश शहादेव ढास (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री मांजरसुंबा घाटात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला अपघात घडला असावा, अशी चर्चा होती; परंतु दुचाकीचे नुकसान झालेले नव्हते. तसेच तरुणाच्या डोक्यावर घाव घातल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हा खून असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यावरून याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नीलेश शहादेव ढास हा सोमवारी सकाळी बीड येथे काही कामानिमित्त आला होता. दुपारी चार वाजता तो मांजरसुंबा घाटाच्या परिसरातील काही मित्रांसह धाब्यावर जेवणासाठी गेला होता. जेवणानंतर तो रात्री दहाच्या सुमारास लिंबागणेशकडे निघाला होता. मांजरसुंबा घाटात दुचाकीवर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही जणांना त्याचा मृतदेह आढळून आला. तरुणाच्या डोक्याला मार लागल्याने अपघात नव्हे तर त्याचा घातपात असावा, अशी चर्चा सुरू होती.

घटनास्थळी नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय लक्ष्मण केंद्रे, बीड ग्रामीणचे पीएसआय रोठे यांनी भेट दिली पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह दुपारी अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. नीलेश ढास याच्या खूनप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित ताब्यात सूत्रधाराचा शोध

नीलेश ढास याच्या खूनप्रकरणी नेकनूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी एका संशयितास ताब्यात घेतले असून या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार मात्र पोलिसांच्या हाती लागेला नाही. नीलेश ढास याचा नेमक्या कोणत्या कारणामुळे खून करण्यात आला याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अधिक तपास नेकनूर पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांनी देखील नेकनूर ठाण्यात तपासकामी दाखल झाले होते.

===Photopath===

290621\29_2_bed_20_29062021_14.jpeg

===Caption===

मयत निलेश शहादेव ढास 

Web Title: Murder of a youth in Manjarsumba Ghat; In the custody of the suspect