बीड जिल्ह्यात मुन्नाभाई एमबीबीएसची शोधमोहीम थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:52+5:302021-06-28T04:22:52+5:30
अंबाजोगाई : कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा घेत अनेक समाजकंटक स्वतःला डॉक्टर संबोधून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार सुरू आहेत. या ...

बीड जिल्ह्यात मुन्नाभाई एमबीबीएसची शोधमोहीम थंडावली
अंबाजोगाई : कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा घेत अनेक समाजकंटक स्वतःला डॉक्टर संबोधून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार सुरू आहेत. या वर्षात दोन घटना समोर आल्या आहेत; परंतु बोगस डॉक्टरांची मोहीम थंडावल्याने शहरात व ग्रामीण भागात बिनधास्तपणे यांचा व्यवसाय सुरू असून, सामान्य रुग्णांच्या जिवाशी त्यांचा खेळ सुरूच आहे.
मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड, आयसीयूमध्ये व क्वारंटाइन सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. शहरात असलेल्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी बेड अपुरे पडू लागले. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिक या बोगस डॉक्टरांकडूनच उपचार घेऊ लागले. एप्रिल व मे महिन्यांत कोरोना रुग्णांचा अचानक वाढलेला मृत्यूदरही यास कारणीभूत राहिला. एकाच दिवसात जिल्ह्यात २५ ते ३० जणांचे झालेले मृत्यू याची माहिती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरली. यामुळे अनेक जण आपल्या गावातच बोगस डॉक्टरकडून उपचार घेऊ लागले. बीड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आरोग्य प्रसासनाने ठोस उपाययोजना न आखल्याने या बोगस डॉक्टरांचे कारनामे वाढीस लागले आहेत.
सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ
१) मार्च ते मे या कालावधीत कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात आली. सर्दी, खोकला, ताप आला तरी कोरोना होतो. असा गैरसमज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरला. जर कोणाला सर्दी झाली तरी लोक सांगणे टाळू लागले. जर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधला, तर तिथे कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले जाते.
२) ही कोरोनाची तपासणी केल्यास व त्या तपासणीत पॉझिटिव्ह आल्यास आपल्याला शहरात असणाऱ्या रुग्णालयात किमान १४ ते १७ दिवस तिथेच ठेवले जाईल. यासाठी कोरोनाची तपासणी न करता, आहे त्या बोगस डॉक्टरांकडून रुग्ण उपचार घेऊ लागले.
३) याचा मोठा गैरफायदा बोगस डॉक्टरांनी उठविला. ते रुग्णांची तपासणी त्यांच्या घरी जाऊन करू लागले. त्यांना औषधी देणे, सलाइन लावणे, असे उपचार घरातच होऊ लागले. यात अनेकांचे आजार बळावले. पुन्हा त्यांच्या कोरोना तपासण्या करून शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ अनेकांवर आली. परिणामी, संसर्ग वाढविण्यासाठी हे बोगस डॉक्टर ही जवाबदार ठरले.
तक्रार आल्यावरच कारवाई
आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, बोगस डॉक्टरची तक्रार आल्यावर संबंधिताची डिग्री तपासली जाते. त्याची डिग्री बोगस आढळल्यावर त्याला पोलिसांच्या हवाली केले जाते; परंतु बोगस डॉक्टरांचा शोधच घेतला जात नाही.
बोगस डॉक्टरांसंदर्भात तूर्तास तरी तक्रारी नाहीत; परंतु आल्यावर तातडीने कारवाई केली जाते. मागील दीड वर्षात दोन बोगस डॉक्टरांना पकडण्यात आले आहे. ही मोहीम आगामी काळात जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
-डॉ. सुरेश साबळे,
जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
बीड जिल्ह्यातील पकडण्यात आलेले बोगस डॉक्टर-२