अंबाजोगाई : शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे लावण्यात येत असल्याने, वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता, हातगाडे पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
धारूर-आडस रस्त्याची डागडुजी सुरू
धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली असून, रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.
स्थानकासमोरील ‘नो पार्किंग’चा बोजबारा
धारूर : धारूर बसस्थानकासमोर वाहतूक पोलीस नसल्याने ‘नो पार्किंग’चा बोजबारा उडाला आहे. सर्रास याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ ‘नो पार्किंग’ची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
बीड बसस्थानकात खड्ड्यांचा त्रास वाढला
बीड : येथील बसस्थानकाचे सध्या नव्याने काम सुरू असून, आगार व स्थानकाचे काम केले जात आहे. परंतु, सद्य:स्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच बसही खिळखिळ्या होत आहेत. यामुळे महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ
अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबा साखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालविली जात असल्याने अपघातांचा धोका वाढत चालला आहे. तरीही, या भरधाव वाहनधारकांना पोलिसांकडून गतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत, कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.