मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:15+5:302021-04-02T04:35:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेर गावाहून अथवा परजिल्ह्यातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती, तशी आता ...

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेर गावाहून अथवा परजिल्ह्यातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती, तशी आता होत नाही. तसेच पूर्वीप्रमाणे आताही पुणे, मुंबईहून आलेल्यांनी जिल्ह्याची चिंता वाढविली आहे. प्रवास करून आलेले बहुतांश लोक कोरोनाबाधित आढळत असल्याचे सांगण्यात आले. काही लोक तर चाचणीही करत नाहीत. अशा लोकांची आरोग्य विभागाकडेही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी पुणे, मुंबईहून आलेले लोक कोरोनाबाधित आढळले होते. त्यावेळीही याच प्रवाशांनी जिल्ह्याची चिंता वाढविली होती. आताही औरंगाबाद, पुणे, आणि मुंबईहून आलेले लोक कोरोनाबाधित आढळत असल्याने पुन्हा जिल्ह्याची चिंता वाढली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांनी स्वता:ची व कुटूंबियांच्या आरोग्याची काळजी म्हणून कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करण्याची गरज आहे.
बाहेरगावातून येणाऱ्यांची चाचणीच नाही
कोरोनाच्या पहिल्या लाटेत परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून आलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जात असे. तसेच त्यांना १४ ते २८ दिवसांसाठी होम क्वारंटाईन बंधनकारक केले होते.
बाहेरगावाहून येणाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्याशी नियमित संपर्कही केला जात होता. ज्यांना लक्षणे आहेत, त्यांना तात्काळ आरोग्य पथकांमार्फत उपचार केले जात होते.
आता परिस्थिती बदलली आहे. सध्या बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणी तर दुरच परंतु साधी नोंदही घेतली जात नाही.
बाहेरगावाहून आल्यानंतर लक्षणे असतानाही कोणीच स्वता:हुन पुढे येत चाचणी करत नाहीत. प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते
दरराेज २ हजारापेक्षा जास्त लोकांचा प्रवास
एसटीबस
सध्या जिल्ह्यातील बससेवा बंद असली तरी परजिल्ह्यातील बसेसची ये-जा सुरूच आहे. दररोज किमान ५०० पेक्षा जास्त लोक परजिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यातील कोणीच कोरोना चाचणी करून सुरक्षित राहत नसल्याचे दिसते.
खाजगी वाहने
बस व इतर सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने लोक खाजगी वाहनांचा आधार घेत बीड जिल्हा जवळ करीत आहेत. यात मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांतून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. औरंगाबादहून येणारे लोकही बीडमध्ये आल्यावर कोरोना चाचणी करीत नाहीत.
रेल्वे
जिल्ह्यात केवळ परळी येथे रेल्वेस्टेशन आहे. येथे हजारपेक्षा जास्त प्रवाशांची नेहमीच चढउतार असते. परंतु येथेही सध्या कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. प्रवासीही प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.