मदत केंद्राबाहेर मुकादम, नातेवाइकांमध्ये हाणामाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST2021-03-22T04:30:44+5:302021-03-22T04:30:44+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील मदत केंद्रात कोरोना अहवाल घेण्यासाठी आलेल्या लोकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका ...

मदत केंद्राबाहेर मुकादम, नातेवाइकांमध्ये हाणामाऱ्या
बीड : जिल्हा रुग्णालयातील मदत केंद्रात कोरोना अहवाल घेण्यासाठी आलेल्या लोकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर रविवारी दुपारी मुकादम आणि नातेवाइकांमध्ये चक्क हाणामारी झाली. पोलिसांनाही पाचारण केले होते. नोडल ऑफिसरच्या मध्यस्थीने हा वाद मिटला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद नव्हती.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि बाधित रुग्ण लवकर शोधून कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाने सर्वच व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील मदत केंद्रातून रितसर अहवाल घेऊनच दुकाने उघडावेत, अन्यथा दुकाने सील करून फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे चाचणी केलेले अहवाल घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी होत आहे. सुरक्षा रक्षकांच्या दुर्लक्षामुळे लोक व्यवस्थित रांगा लावत नाहीत. याच रांगा लावण्यावरून येथील मुकादम गव्हाणे व एका दांपत्याचे वाद झाले. एकमेकांवर धावून जात धक्काबुक्कीही करण्यात आली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नोडल ऑफिसर डॉ.बाबासाहेब ढाकणे यांनी धाव घेतली. सर्वांना रांगेत उभा करून पोलिसांनाही पाचारण केले. त्यानंतर मुकादम व नातेवाइकांची समजूत काढत हा वाद मिटविला. तसेच सामान्यांना लवकर अहवालाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सर्वांना सूचनाही केल्या. डॉ.ढाकणे यांनी नियोजन केल्यानंतर दुपारनंतर परिस्थिती सुरळीत झाल्याचे दिसले.
या सुधारणा करणे आवश्यक
मदत केंद्रात मनुष्यबळ वाढवावे
पॉझिटिव्ह लोकांना रांगेत उभा राहू न देता नातेवाइकांना सांगावे, अथवा त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी
गर्दी कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करावा
कर्मचाऱ्यांचा संवाद चांगला ठेवून संतापलेल्या लोकांची समन्वयाने समजूत काढावी
रांग तोडून ओळखीने अहवाल घेण्यास बंदी घालावी
मदत केंद्र वगळता इतर कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप टाळावा
===Photopath===
210321\212_bed_17_21032021_14.jpeg~210321\212_bed_16_21032021_14.jpeg
===Caption===
रूग्णालयात धाव घेत डॉ.बाबासाहेब ढाकणे यांनी हा वाद मिटविला. नातेवाईकांची समजूत काढताना छायाचित्र.~जिल्हा रूग्णालयात मुकादम व नातेवाईकांमधील वादाचे चित्र.