महावितरणचा शॉक; मुजोर, कामचुकार नऊ तंत्रज्ञ निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:48+5:302021-03-13T04:59:48+5:30
बीड : ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, अपमानास्पद वागणूक देणे, विनापरवानगी गैरहजर राहणे असा ठपका ठेवत कामचुकार व मुजोर असलेल्या ...

महावितरणचा शॉक; मुजोर, कामचुकार नऊ तंत्रज्ञ निलंबित
बीड : ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, अपमानास्पद वागणूक देणे, विनापरवानगी गैरहजर राहणे असा ठपका ठेवत कामचुकार व मुजोर असलेल्या अंबाजोगाई विभागातील नऊ तंत्रज्ञांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महावितरण विभागाच्या अंबाजोगाई उपविभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईने कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच ‘शॉक’ बसला आहे.
मागील काही महिन्यांपासून वीज पुरवठ्याबाबत महावितरणबद्दल तक्रारी वाढत आहेत. तसेच वाढीव वीज बिल, बिल कमी करण्यास गेलेल्या व तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देणे, अरेरावी करण्याचे प्रकार वाढले होते. वाढत्या तक्रारी पाहून अंबाजोेगाई विभागाचे कार्यकारी अभियंता संदीजचाटे यांनी अशा कामचुकारांचा अभियंत्यामार्फत अहवाल मागविला होता. यात विनापरवानगी गैरहजर राहणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण न करणे, थकबाकी वसूल न करणे, भ्रमणध्वणी वारंवार बंद ठेवणे, रोहित्राचा सर्व्हे वेळेवर न करणे, नेमून दिलेले कामकाज न करणे, ग्राहकांशी हुज्जत घालणे अशा आशयाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर संदीप चाटे यांनी सर्वांना निलंबनाची कारवाई करून शॉक दिला.
दरम्यान, अंबाजोगाई विभागातील या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे. परंतु, बीड विभागातही असे प्रकार वारंवार घडत आहेत. याच्या तक्रारींचाही ढिगारा असताना बीड विभागात कारवाई होत नाही. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे. अंबाजोगाईप्रमाणेच बीडमध्येही चौकशी करून कारवाया कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या तंत्रज्ञांना निलंबनाचा शॉक
संजय कमलाकरराव काळे (प्रधान तंत्रज्ञ, पात्रुड/तेलगाव, ता. माजलगाव), प्रशांत प्रकाश कोपले (तंत्रज्ञ, अंबाजोगाई शहर), मुरलीधर रामदास गाडेकर (प्रधान तंत्रज्ञ पाटोदा, ममदापूर, ता. अंबाजोगाई), रवी बापूराव मुंडे (तंत्रज्ञ घाटनांदूर, ता. अंबाजोगाई), श्रीराम दशरथ मुंडे (तंत्रज्ञ परळी शहर), गोपाळ भगवानराव काकडे (तंत्रज्ञ, परळी शहर), रंजना शिवदास मुंडे (वरिष्ठ तंत्रज्ञ, परळी ग्रामीण), भास्कर नामदेव मुंडे (वरिष्ठ तंत्रज्ञ, धर्मापुरी, ता. परळी) व महादेव राजेंद्र वाघमारे (तंत्रज्ञ, दिंद्रुड, ता. माजलगाव) अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.