‘एमपीएससी’चे विद्यार्थी संभ्रमात; स्पर्धा परीक्षेपासून विद्यार्थी दुरावत चालले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:04+5:302021-07-08T04:23:04+5:30
अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे ...

‘एमपीएससी’चे विद्यार्थी संभ्रमात; स्पर्धा परीक्षेपासून विद्यार्थी दुरावत चालले
अविनाश मुडेगावकर/
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी परीक्षा व नियुक्त्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ४० हजार विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. परीक्षा कधी होणार याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.
कधी कोरोनाचा प्रादुर्भाव तर कधी तांत्रिक कारणांमुळे एमपीएससीच्या परीक्षा, तसेच पदभरती रद्द करण्यात आली. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचे कारण पुढे करीत गेल्या दीड वर्षापासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला, तर सर्वसामान्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून परीक्षा रद्द करणे, नियुक्ती रखडणे, नवीन पदभरती न करणे अशा विविध कारणांमुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. काही विद्यार्थी एमपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन अंतिम परीक्षेची प्रतीक्षा करीत आहेत. अनेक जण परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांची नियुक्ती झालेली नाही. मार्च २०२० पासून आजपर्यंत पूर्वपरीक्षा झालेली नाही. दरवर्षी मार्च महिन्यात पूर्वपरीक्षा होत असते. राज्यसेवा परीक्षा आतापर्यंत चार वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आतापर्यंत निकाल लागलेला नाही. संयुक्त पूर्वपरीक्षा ५ वेळा पुढे ढकलण्यात आली, तर आरटीओची पूर्वपरीक्षा होऊन दीड वर्ष झाले, अद्याप निकाल लागला नाही. दोन वर्षांपूर्वी जे विद्यार्थी सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या दोन्ही परीक्षा पास झाल्या, त्यांच्याही नियुक्त्या रखडल्या आहेत.
...
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?
गेल्या काही वर्षांत एमपीएससी परीक्षेच्या तारखेबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. परिणामी परीक्षार्थी मुलांचे व मुलींचे वय निघून जात आहे. त्यामुळे राज्य सरकार परीक्षांची तारीख कधी जाहीर करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
....
क्लास चालक आले अडचणीत
आजच्या स्थितीत एमपीएससी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांवरील विश्वास कमी होत चालला आहे. प्रशासनातील कमी होत चाललेली पदे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढवित आहेत. प्रशासकीय सेवेकडील विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. त्यामुळे हुशार विद्यार्थी प्रशासनात येण्यापासून दुरावत आहेत. शासनाच्या बेजबाबदारपणामुळे स्पर्धा परीक्षेतील गुंतागुंत वाढत चालली आहे.
-प्रा. नागेश जोंधळे, क्लास चालक.
,...
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्यामुळे अंबाजोगाई, बीड, परळी या शहरांतील सर्व क्लासेस बंद आहेत. जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या काळात हे विद्यार्थी आपापल्या गावी परतले आहेत, परंतु परीक्षेची त्यांची तयारी सुरूच आहे. परीक्षा वेळेवर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले आहे.
-कल्याण नेहरकर, क्लास चालक.
...
विद्यार्थ्यांचे वय चालले निघून
गेल्या दीड वर्षापासून स्पर्धा परीक्षा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय निघून चालले आहे. परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना इतर ठिकाणी कामही करता येत नाही. अनेकांनी कंटाळून परीक्षेची तयारी करणे सोडून दिले आहे.
-मोहित कुलकर्णी, विद्यार्थी.
....
शासनाच्या दिरंगाईचा फटका
बीड जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षांमध्ये मागे होता, मात्र या दहा वर्षांत परिस्थिती बदलली आहे. आता विद्यार्थी भवितव्य घडविण्यासाठी सक्रिय झाले आहेत, तर त्यांना प्रशासनाच्या दिरंगाई कारभाराचा फटका बसत आहे.
-वेदांत देशमुख, विद्यार्थी.
....
ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार?
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्बंध लागू आहेत. यामध्ये क्लासेसला परवानगी न दिल्याने स्पर्धा परीक्षेचे क्लास सध्या ऑनलाईन सुरू आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून हेच सुरू आहे, त्यामुळे गैरसोय होत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत.
क्लासेसला परवानगी केव्हा मिळणार, आणखी किती दिवस ऑनलाईन क्लास चालणार, असे प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहेत.