बीड : ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.चे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ यांच्या नावावर असलेल्या ८० स्थावर मालमत्तांचा एमपीआयडी ( महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण) कायद्याअंतर्गत प्रस्ताव मुंबई येथे अपर पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुढे गृहमंत्रालयात गेल्यानंतर मालमत्ता विक्रीला मंजुरी मिळणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राप्त झाली.
ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या २३ शाखा बीड जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात तक्रारदारांच्या माध्यमातून आतापर्यंंत ६५ गुन्हे दाखल आहेत. या शाखेतील ११ हजार २११ ठेवीदारांचे एकूण ६३६ कोटी २६ लाख ९१ हजार ४५७ रुपयांचा विश्वासघात व फसवणूक झाल्याबद्दलच्या तक्रारी आहेत. या तक्रारींमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातील २३ शाखेतील स्थावर व जंगम मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे.
८० मालमत्तांच्या लिलावातून ठेवीदारांना पैसे -आर्थिक गुन्हे शाखेने ज्ञानराधाच्या ८० स्थावर मालमत्तांचा प्रस्ताव मुंबई येथे अपर पोलिस महासंचालकांना पाठविला आहे. तेथून प्रस्ताव गृहमंत्रालयात पाठविण्यात येणार आहे. गृहमंत्रालयातून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर ८० मालमत्तांचा लिलाव करण्यासंदर्भात नोटिफिकेशन निघेल. त्या नोटिफिकेशनमध्ये येणाऱ्या मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांना लिलावाद्वारे विकता येणार आहे. या लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळणार आहे.
यांनी पाठविला तातडीने प्रस्ताव -११ हजार ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी ज्ञानराधाच्या ८० मालमत्तांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. एस. शेजाळ, सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. घोळवे, पी. एस. भागिले, सहायक फौजदार मुकुंद तांदळे, राख, वाघ, पोलिस हवालदार मेहत्रे, रामदास तांदळे, ठोंबरे, पोलिस कर्मचारी संजय पवार यांनी पाठविला आहे.