माजलगावात मोटरसायकल चोऱ्या सर्रासपणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST2021-03-09T04:35:48+5:302021-03-09T04:35:48+5:30
माजलगाव : माजलगाव शहरात मागील महिनाभरात जवळपास एक दिवसाआड दुचाकी मोटारसायकल चोऱ्या भरदिवसा सुरूच असून शनिवारी तहसील ...

माजलगावात मोटरसायकल चोऱ्या सर्रासपणे सुरूच
माजलगाव : माजलगाव शहरात मागील महिनाभरात जवळपास एक दिवसाआड दुचाकी मोटारसायकल चोऱ्या भरदिवसा सुरूच असून शनिवारी तहसील परिसरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी प्रभाकर कठाळू पोटभरे यांची हिरो स्प्लेन्डर प्लस (एम एच ४४-एल ७५०१) ही गाडी दुपारी एक ते दीडच्या सुमारास पार्किंगमधून हँडललॉक तोडून तहसील आवारातून लंपास करण्यात आली.
शहरात मागील सहा महिन्यांपासून रहदारीच्या ठिकाणी दररोज भरदिवसा रोज एक मोटरसायकल चोरी तर रात्री घरफोडी असे प्रकार सातत्याने सुरू असून येथील पोलीस यंत्रणा ढेपाळली असल्याने गुन्हेगारांवर त्यांचा वचक राहिला नाही. २० फेब्रुवारी रोजी नवीन बसस्थानकासमोरून सुधीर नागापुरे यांची होंडा शाईन (एम एच २३ एक्यू १६६९) ही मोटारसायकल सायंकाळी सातच्या दरम्यान लंपास करण्यात आली होती. माजलगाव शहरात आंबेडकर चौक, नवीन बसस्थानक, लोकनेते महाविद्यालय परिसर, संभाजी चौक, सन्मित्र कॉलनी, विवेकानंदनगर, विविध बँका, नागरी वसाहती आदी ठिकाणी दररोज एक मोटरसायकल चोरी होण्याची घटना सातत्याने घडत आहे त्यामुळे जनतेच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. ती दूर करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. छोट्या-मोठ्या कामासाठी खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची पाच मिनिटात मोटारसायकल गायब होते. यावरून सराईत गुन्हेगारांची टोळी येथे कार्यरत असल्याचे दिसून येते. ज्यांच्या मोटरसायकली चोरी गेल्या, त्या पुन्हा मिळतच नाहीत. त्यामुळे बरेच नागरिक तक्रार देण्यास धजावत नाहीत, म्हणूनच चोरट्यांचे फावत आहे.