परळी: तालुक्यातील भोजनकवाडी येथे काल(२० सप्टेंबर रोजी) रात्री ९.३० वाजता घर नावावर करुन न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मृत महिला सुनंदा ज्ञानोबा कांगणे (वय ४५, रा. भोजनकवाडी) यांच्या नावावर असलेल्या घरावरुन वारंवार वाद होत होता. घर नावे करुन देण्यास आईने नकार दिल्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत ज्ञानोबा कांगणे (वय २८) याने आईच्या डोक्यात कुरुंदाचा दगड घातला. यात सुनंदा कांगणे यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मजहर सय्यद, उपनिरीक्षक शेख यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
आरोपी ताब्यात
या प्रकरणी उमाकांत रमेश केदार (रा. भोजनकवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिसांनी आरोपी चंद्रकांत कांगणे याला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.