मृत्युदर वाढताेय; चार दिवसांत नऊ कोरोना बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:40+5:302021-03-05T04:33:40+5:30
बीड : जिल्ह्यात उपचारात हलगर्जी होत असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा मृत्युदर वाढत आहे. गुरुवारी आणखी दोन मृत्यूची नोंद आरोग्य ...

मृत्युदर वाढताेय; चार दिवसांत नऊ कोरोना बळी
बीड : जिल्ह्यात उपचारात हलगर्जी होत असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा मृत्युदर वाढत आहे. गुरुवारी आणखी दोन मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. मागील चार दिवसांत तब्बल चौघांचा कोरोनाने जीव घेतला आहे. तसेच नव्या रुग्णांची संख्याही वाढत असून, गुरुवारी आणखी ५७ रुग्णांची भर पडली. तसेच ४८ जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबविण्यात आरोग्य विभागाला पूर्णपणे अपयश येत असल्याचे दिसत आहे. तसेच नवे रुग्णही दिवसेेंदिवस वाढत आहेत. तीन दिवसांत ७ मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी आणखी दोघांची यात भर पडली. यात आडस (ता. केज) येथील ८० वर्षीय पुरुष व गेवराई शहरातील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील ९४७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ८९० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ५७ बाधित निष्पन्न झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २२, अंबाजोगाई ११, आष्टी ९, केज २, तसेच गेवराई, माजलगाव परळी व शिरुरकासार तालुक्यांत प्रत्येकी तीन व पाटोदा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १९ हजार २१ इतका झाला आहे. पैकी १८ हजार ७१ जण कोरोनामुक्त झाले असून, ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, डॉ. पी. के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
मृत्यूसंख्या वाढल्याने चिंता
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण मृत्यूचे प्रमाण गत दोन महिन्यांत आटोक्यात आले होते; मात्र मागील चार दिवसांत हेच मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढले आहे. चार दिवसांत नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. यात बुधवारी चार, तर त्यापूर्वी रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत तिघांच्या मृत्यूची नोंद झाली होती, त्यानंतर गुरुवारी पुन्हा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता आजपर्यंतच्या एकूण मृत्यूची संख्या ५८५ झाली आहे.
उपचारांबद्दल तक्रारी कायम
जिल्हा रुग्णालयासह स्वाराती रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. केवळ करोडो रुपयांची कागदोपत्री उधळपट्टी केली जात आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही जिल्हाधिकारी अथवा लोकप्रतिनिधी यावर कारवाई करीत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सीएसकडून राऊंडच नाही
जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदभार स्वीकारलेले डॉ. सूर्यकांत गित्ते हे स्वत: फिजिशियन आहेत. कोरोनाबाधितांवर उपचारात फिजिशियनची मोठी जबादारी आहे. परंतु डॉ. गित्ते हे कोरोना राऊंडकडे फिरकलेच नाहीत. केवळ प्रशिक्षण केंद्र व अस्थापना विभागातून सूचना करीत आहेत. त्यामुळे कोरोना वाॅर्डमधील राऊंड वेळेवर होत नाहीत. सुविधा मिळत नाहीत. एमबीबीएस डॉक्टर गायब होऊन बीएएमएस डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. यापूर्वी डॉ. गित्ते यांना संपर्क करूनही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ते माध्यमांपासून दूर राहात असल्याने त्यांना यावेळी संपर्क केला नाही.