'स्वाराती'च्या प्रयोगशाळेत ८ महिन्यांत १ लाखांहून अधिक कोरोना तपासण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST2021-03-08T04:30:52+5:302021-03-08T04:30:52+5:30
अंबाजोगाई : कोरोना महामारीच्या संकटात आरटीपीसीआर तपासणीद्वारे कोरोनाचे निदान करण्याकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ८ ...

'स्वाराती'च्या प्रयोगशाळेत ८ महिन्यांत १ लाखांहून अधिक कोरोना तपासण्या पूर्ण
अंबाजोगाई : कोरोना महामारीच्या संकटात आरटीपीसीआर तपासणीद्वारे कोरोनाचे निदान करण्याकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ८ जून २०२० रोजी सुक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गत व्हीआरडीएल प्रयोगशाळेची सुरुवात झाली. २४ तास अविरत व्हीआरडीएल प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यापासून दिवसातून ३ वेळा तपासणीचे अहवाल देण्यात येतात. सुरू झाल्यापासून अवघ्या आठ महिन्यात या प्रयोगशाळेतून १ लाखांहूनही अधिक कोरोना तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री धनंजय मुंडे, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, संचालक यांच्या प्रयत्नातून आणि तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या नेतृत्त्वातून तालुकास्तरावर स्वाराती रुग्णालयात महाराष्ट्रातील एकमेव कोरोना निदान प्रयोगशाळेला सुरुवात झाली. बीड जिल्हा प्रशासन यांच्याकडून प्रयोगशाळा सुरू होताना ३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या मार्फत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख डॉ. एस.एल. निळेकर व लॅब इंचार्ज डॉ. डी. एम. कुलकर्णी यांच्या अविरत प्रयत्नांमुळे सुरुवातीला बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यातील कोरोना तपासणी व त्यानंतर बीड जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणी शक्य झाली. कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरटीपीसीआर या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी कोणते औषध द्यायचे हे ठरवणे शक्य होते. आयसीएमआर, दिल्ली व एम्स, नागपूर यांच्या गुणवत्ता तपासणीमध्ये व्हिआरडीएल लॅबची तपासणी गुणवत्तापूर्ण ठरली.
प्रयोगशाळेत तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळ कार्यरत
या प्रयोगशाळेसाठी बीड जिल्हा प्रशासन व संचालनालय वैद्यकीय शिक्षण यांच्या समन्वयातून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ १८, डाटा एन्ट्री ऑपरेटर ६ व वर्ग-४चे ४ कर्मचारी तसेच विभागप्रमुख सुक्ष्मजीवशास्त्र डॉ.एस. एल. निळेकर, लॅब इन्चार्ज डॉ. डी.एम. कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र डॉ. आर. एस. ओव्हाळ, डॉ. सी. एस. हलगरकर, डॉ. आशा बोईनवाड, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. अर्जुन जाधव, डॉ. अमित लोमटे व डॉ. सीमा काटोले या तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळावर व्हिआरडीएल प्रयोगशाळा सुरू करण्यात आली होती.
कोरोना संशयित रुग्णांचा उपचार करण्यासाठी आरटीपीसीआर या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी कोणते औषध द्यायचे, हे ठरवणे शक्य होते. यामुळे रुग्णांना तत्पर सेवा देता आली याचे समाधान आहे.
- डाॅ. शिवाजी सुक्रे (अधिष्ठाता, स्वाराती शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय, अंबाजोगाई)