मोकाट जनावरे उठले नागरिकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:49+5:302021-07-19T04:21:49+5:30
कुत्रे घेतायेत चावा; नागरिक पालिकेत बांधणार जनावरे माजलगाव : शहरांतील रस्ते, वस्त्यांमध्ये मोकाट कुत्रे, जनावरांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस ...

मोकाट जनावरे उठले नागरिकांच्या जीवावर
कुत्रे घेतायेत चावा; नागरिक पालिकेत बांधणार जनावरे
माजलगाव : शहरांतील रस्ते, वस्त्यांमध्ये मोकाट कुत्रे, जनावरांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस या मोकाट जनावरांची दहशत वाढत आहे. पालिकेकडून मात्र मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने पालिकेच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त होत आहे.
अनेक प्रभागात मोकाट कुत्रे, गायी यांचे वास्तव्य वाढले आहे. नागरिकांच्या अंगावर धावून जाऊन अनेकांना चावा घेण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत.
नगरपालिका प्रशासनाने याकडे पुरता कानाडोळा करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गाफील राहत आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक प्रभागात आणि मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे हे आपले बस्तान मांडत असल्याने त्याचा वाहतुकीलादेखील मोठ्या प्रमाणावर अडथळा होत असून, यापूर्वी या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात जीवसुद्धा गेले आहेत. असे असताना नगरपालिका प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे. शहरातील अनेक भागात रस्त्याची कामे सुरू आहेत आणि गेल्या काही दिवसात पावसानेदेखील हजेरी लावली आहे, त्यामुळे खड्डेमय रस्ते आणि त्यात अरुंद झालेले रस्ते आणि मोकाट जनावरांनी भररस्त्यात बसवलेले आपले बस्तान यामुळे नागरिक अक्षरशः आपला जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालताना दिसून येत आहेत. या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. या जनावरांना कोंडवाड्यात टाकावे. नगराध्यक्ष आणि पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन नागरिकांचे जीव सुरक्षित करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. यापूर्वी मोकाट जनावरांनी मारल्यामुळे तिघांना प्राण गमवावे लागले होते. असे असतानाही नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष दिसून येते.
180721\18bed_3_18072021_14.jpg