बेपत्ता भोळसर मुलगी पोलिसांमुळे सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:16 IST2018-02-22T00:12:25+5:302018-02-22T00:16:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मागील आठ दिवसांपासून गायब असलेल्या मुलीला पोलिसांमुळे आई-वडील परत मिळाले आहेत. सदरील मुलगी भोळसर ...

बेपत्ता भोळसर मुलगी पोलिसांमुळे सापडली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील आठ दिवसांपासून गायब असलेल्या मुलीला पोलिसांमुळे आई-वडील परत मिळाले आहेत. सदरील मुलगी भोळसर असल्याने घरातून निघून गेली होती. बुधवारी दुपारी मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
काकडहिरा (ता.बीड) येथील १४ वर्षे वयाची मुलगी गायब असल्याने शोधाशोध सुरू होती. ही मुलगी भोळसर आहे. यापूर्वी तीन वेळेस ती घरातून निघून गेली होती. परंतु तेव्हा ती लवकर सापडली. यावेळेस मात्र ती मागील आठ दिवसांपासून गायब होती. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही.
बुधवारी ती बीड तालुक्यातील कोळवाडी येथे असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ धाव घेत मुलीला ताब्यात घेत ठाण्यात आणले. येथे तिच्या आई वडिलांसह सरपंचांना बोलावण्यात आले. ओळख पटल्यानंतर त्यांच्या स्वाधीन केले. पोलीस कर्मचारी एच.ए.इंगळे, बी.एस.सातपुते, होमगार्ड वाघमारे, दुर्गा दळवी यांनी यासाठी परिश्रम घेतले. यावेळी जयसिंग वाघ, भागवत शेलार, भागवत वाघमारे, नारायण बागलाने, अमोल बागलाने, पी.बी.सांगळे आदींची उपस्थिती होती. सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी त्यांना मार्गदर्शन केले.