पारा चढताच लिंबाचा तोरा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST2021-04-04T04:34:51+5:302021-04-04T04:34:51+5:30
अविनाश कदम आष्टी : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने लिंबू आता चांगलाच भाव खात आहे. गेल्या १५ दिवसांत लिंबाच्या ...

पारा चढताच लिंबाचा तोरा वाढला
अविनाश कदम
आष्टी : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने लिंबू आता चांगलाच भाव खात आहे. गेल्या १५ दिवसांत लिंबाच्या दरात दुप्पट वाढ झाली असून लिंबाची मागणीदेखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, अशा परिस्थितीत लिंबाची आवक घटली असून, लिंबाचे दर दुपटीने वधारले आहेत. काही दिवसांपूर्वी ४० रुपये किलो असणाऱ्या लिंबाने ९० रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे.
सी जीवनसत्व असणाऱ्या लिंबाचा खाद्यपदार्थांसह औषधांसाठी वापर होतो. कोरोनासह इतर अनेक आजार रोखण्यासाठी लिंबू आरोग्यवर्धक आहे. लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लिंबू लागवडीसह व्यवसायाकडे वळल्याचे दिसत आहे. मागील महिन्यापासून तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याने लाहीलाही होणाऱ्या शरीराला थंडावा देण्यासाठी व ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबाचे सरबत जास्त प्रमाणात लोक घेत आहेत. विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी देखील डिकाशन चहा पिण्यावर नागरिकांचा भर असून यामध्ये लिंबाचा वापर केला जातो. उसाचा रस काढतानादेखील लिंबाचा वापर केला जातो. सध्या आवक घटत चालली असून मागणी जास्त असल्याने लिंबाच्या वाढत्या किमतीने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. लिंबाचे भाव वाढल्याने उसाच्या रसाचे भावही वाढले असून मागील वर्षी १० रुपयाला मिळणाऱ्या रसाच्या ग्लाससाठी आता १५ रुपये मोजावे लागतात. तसेच लिंबू सरबताचे भाव वाढले आहेत. हॉटेलमधील प्लेटमधूनही लिंबू गायब होऊ लागले आहे. एप्रिल महिन्यात लिंबाचे दर ९० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे मे व त्यापुढील महिन्यात काय होणार, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.
उन्हळ्यापर्यंत भाव चढेच राहणार
सध्या लिंबाचे भाव वाढले आहेत. लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. जुलै ते जानेवारीपर्यंत ३ ते ४ टन आवक आमच्याकडे होत असते. आता फक्त १ टनाच्या आसपास लिंबाची आवक होत आहे. उन्हाळ्यामुळे लिंबाची वाढती मागणी पाहता व आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबाचे दर असेच चढे राहतील.
- गणेश चौधरी, लिंबाचे ठोक व्यापारी, आष्टी.
===Photopath===
030421\img-20210403-wa0324_14.jpg