कोरोना चाचणी न करताच व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:10+5:302021-03-17T04:34:10+5:30
बीड : शहरातील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. यासाठी १५ मार्चची मुदत होती, परंतु केवळ चार हजार व्यापाऱ्यांनी ...

कोरोना चाचणी न करताच व्यापाऱ्यांनी उघडली दुकाने
बीड : शहरातील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. यासाठी १५ मार्चची मुदत होती, परंतु केवळ चार हजार व्यापाऱ्यांनी चाचण्या केल्या. इतरांनी मात्र चाचणी न करताच दुकाने उघडल्याचे मंगळवारी समोर आले आहे. प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. दिवसभरात ना तपासणी केली, ना कारवाई. त्यामुळे रोष व्यक्त होत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी १५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले होते. जे चाचणी न करता दुकाने उघडतील, त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. त्याप्रमाणे १० मार्चपासून बीड शहरात चाचणीला सुरुवात झाली. १५ मार्चपर्यंत केवळ चार हजार व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेतल्या. यात १०० पेक्षा जास्त व्यापारी बाधित आढळले. परंतु शहरातील व्यापाऱ्यांची संख्याही जवळपास १० हजारांपेक्षा जास्त आहे. अद्यापही सहा हजार व्यापाऱ्यांनी चाचणी केली नाही, असे असले तरी मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सुभाष रोड, माळीवेस, कारंज, मोंढा आदी भागांतील काही व्यापाऱ्यांनी चाचणी न करताच मंगळवारी दुकाने उघडली. या दुकानांची तपासणी करण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. परंतु दिवसभरात पालिकेने कोणत्याच दुकानांची तपासणी केली नाही. त्यामुळे कारवाईचा संबंधच येत नाही. यावरून पालिकेकडून आणि प्रशासनाकडून व्यापाऱ्यांबाबत दुजाभाव केल्याचे दिसत आहे. बीड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वणी बंद होता.
टपरी, हॉटेलही उघडे
जिल्ह्यातील सर्वच टपऱ्या आणि हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली होती. परंतु बीडमध्ये सर्रासपणे हॉटेल आणि टपऱ्या उघड्या दिसतात. हॉटेलमध्ये बसून जेवणासाठी अक्षरश: गर्दी होताना दिसत आहे. प्रशासनाने काढलेेले आदेश हे कागदावरच असल्याचे दिसते.